कल्याण पूर्वेत रॉटरी क्लबची
शाखा सुरु करणारे संस्थापक श्री. संदीप कृष्णा चौधरी.....
कल्याण पूर्वेत रोटरी क्लबची शाखा सुरु करणारे संस्थापक श्री. संदीप कृष्णा चौधरी.....
दूरदृष्टी, कल्पक, मेहनत या त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या व्यवसायात प्रगती करत असून नवनवीन व्यक्तींना संधी निर्माण करून देणारे, सतत नेतृत्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संदीप कृष्णा चौधरी. मित्र योगेश कलापुरे यांच्या निमंत्रणानंतर २०१२ मध्ये रोटरी क्लब ऑफ रीव्हर साईडचे सदस्य झाले. अवघ्या दोन वर्षात २०१४ मध्ये कल्याण पूर्वेच्या सामाजिक विकासासाठी कल्याण पूर्वेत रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची निर्मिती केली. आपल्या क्लबच्या कार्यामुळे प्रथम वर्षीच डिस्ट्रिक्ट सी १४० कडून गोल्ड क्लब म्हणून सन्मानित करण्यात आले.
इंग्रजी माध्यमातून बालपणीचे शिक्षण झाले. गणित व विज्ञान हे विषय सुरुवातीपासूनच आवडीचे त्यात इयत्ता ७ वी ला असताना त्यांच्या शाळेच्या वतीने नेहेरु सायन्स सेंटरमध्ये नेण्यात आलेल्या विज्ञान सहलीत निवडक मुलांमध्ये संदीप यांची निवड झाली तो दिवस आजही संदीप यांना स्पष्ट पणे आठवतो. इयत्ता १० वी मध्ये ८५ टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी बिर्ला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयातील शिक्षणाबरोबर ते अर्थार्जन करू लागले. त्यांच्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांच्या ते शिकवण्या घेऊ लागले. तसेच ११ वी नंतरच्या येणाऱ्या उन्हाळी सुट्यांमध्ये डोंबिवली येथील एम.आई.डी.सी. तील सुनिल डाईंग फॅक्टरीमध्ये कामाला जात असत. कल्याण ते डोंबिवली हा प्रवास ते सायकल वर करीत असत. काम करीत असताना टेल्को ह्या कंपनीत त्यांची मुलाखात झाली परंतु त्या वेळेस त्यांचे वजन फक्त ३३ किलो असल्याने ते शारीरिक क्षमता चाचणीमध्ये नापास झाले ह्या गोष्टीची खंत न बाळगता संदीप ह्यांनीं शरीर सुदृढ करण्याचा दृढ निश्चय केला आणि रिक्रीएशन व्यायाम शाळेत प्रवेश घेतला. सातत्य आणि शिस्त तसेच मेहेनत यामुळे त्यांनी पुढील वर्षात शरीर सौष्ठ (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेत रामबागश्री आणि बिर्लाश्री हा पुरस्कार प्राप्त केला. तसेच वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात ठाणे जिल्ह्यात तृतिय क्रमांक संपादन केले. नाकाराने खचून न जाता त्याच क्षेत्रात यश संपादन केले त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्ष होते.
व्यावसायिकता किशोर वयापासूनच होती. लहान इयत्तेत असणाऱ्या मुलांच्या शिकवण्या घेणे तसेच सण-उत्सव जवळ आले कि त्या सणाला लागणाऱ्या गोष्टींचा व्यवसाय करणे; उदाहरणार्थ दिवाळीत फटाक्यांचा व्यवसाय करणे, यामुळे कुठेही त्यांच्या अभ्यासावरती परिणाम झाला नाही. १२ वीत संदीप प्रथम वर्गाने पास झाले. पुढे यक्ष प्रश्न होता पास तर झालो परंतु इंजिनीरिंग साठी लागणारे फी चे पैसे भरणे शक्य नव्हते, परंतु इच्छा असेल तर मार्ग निघालाच पाहिजे. नवसील कंपनीमध्ये इंजिनीरिंग चे प्रशिक्षणार्थी म्हणून संदीप चौधरी यांची निवड झाली कंपनी तर्फे पी. व्ही. एम. एस. या महाविद्यालयात इंजिनीरिंगचे शिक्षण घेण्यास पाठवत असत. अशा प्रकारे संदीप चौधरी इंजिनिअर झाले. पुढे याच कंपनीमध्ये १९८८ ते १९९१ पर्यंत संदीप चौधरी यांनी इंजिनीअर म्हणून काम केले. पुढे ए. के. इंजिनीअरिंग कंपनीत नोकरी केली. याच दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून आपले काम वाढवले. थेऊर येथील यशवंत चव्हाण साखर कारखान्यातील डिस्टिलरी प्लांटच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी कंपनीतर्फे संदीप यांच्यावर सोपवण्यात आली. महाराष्ट्र बरोबर गुजरात, गोवा, पंजाब, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये कामानिमित्त भटकंती होत होती. बायर्स केमिकल या कंपनींत १० वर्ष संदीप यांनी नोकरी केली आणि याच दरम्यान संदीप यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात पाण्याचे पंप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. शनिवार किंवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ ही काम होत होती. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथील हौसिंग सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची काम सुरु झाली. यातूनच वैदेही इंजिनिअरिंग आणि पी. के. इंजिनीअरिंग अशा दोन कंपन्याची सुरुवात झाली साल होते १९९३ श्री एन्टरप्राइसेस हा सुद्धा याचाच भाग होता.
पंकज चौधरी हा लहान भाऊ व्यायसायात मदत करू लागला. वर्षभरातच ४५० हाऊसिंग सोसायटीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर इंटेरिअर डिसाईनिंगची कामे घेऊ लागले. पहिले काम होते ते श्री भोसले यांच्या घरातले. हिराबागेत पहिले घर पूर्ण केले व पुढे १०,७२३ घरांचे इंटेरिअर पूर्ण करण्यात आले. २००७ मध्ये लोकगृपचे २२ प्रोजेक्टस मिळाले. २०११ मध्ये नेपच्युन इन्फोटेक अंधेरी या कंपनीचे काम केले. २०११ मध्ये फोर्टिज हॉस्पिटलचे काम, २०१२ मध्ये एल. आई. सी. कार्यालयाचे काम, पतपेढी, मल्टीस्पेसीआलिस्ट हॉस्पिटल, पोलीस स्टेशन्स, राजकीय नेत्यांची कार्यालये, शासकीय अधिकाऱ्यांची घरे असे विविध प्रकारचे काम नवीन कंपनी गृह रचना इंटेरिअर अँड एक्सटेरिअर प्रस्थापित करून तेथून पार पाडण्यात आले.
२०१३ मध्ये बिसिनेस एक्सिलेन्स ह्या अवार्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श प्रतिष्ठाण ठाणे यांच्या वतीने उद्योगरत्न हा पुरस्कार देण्यात आला.
वाचकांसाठी संदेश: इतरांना सतत मदत करत राहा. त्याची फळे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात मिळतच राहतील.