Friday, 11 November 2016

निलेश कानिफनाथ अभंग - तरूण उद्योजक.


निलेश कानिफनाथ अभंग
तरूण उद्योजक.

कल्याण पुर्वेतील अनेकांना ओळखीचा असलेला चेहरा म्हणजे निलेश अभंग, सतत हसतमुख चेहरा आणि डोळे अत्यंत बोलके आणि महत्वाकांक्षी, शारीरभाषा (Body Language) निगर्वी. इतरांशी आस्थेने संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या काळजात निलेश कधी घर करतो, ते कळतही नाही.  

आज निलेशने व्यवसायांत उत्तम जम बसवलेला आहे. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर या व्यवसायिक संस्थेचा विकास वेगाने होत आहे. प्रामाणिकपणा आणि आत्यंतिक व्यवहारकुशलतेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यात निलेशला यश मिळाले. शासनाच्या ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टसाठी काम करताना ऑनलाईन कागदपत्रे बनवून देण्यात निलेश यांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर अग्रेसर असते. सत्यमची सहा जणांची प्रोफेश्नल टीम नागरिकांच्या सेवेत सतत कार्यरत असते.   रोज ३००-३५० नागरिक शासकीय कागदपत्रे बनवण्यासाठी सेंटरमध्ये येतात. त्यामुळे नागरिकांचा सतत राबता असलेले  हे सेंटर, कल्याण तालुक्यात फार कमी कालावधीत नावारुपाला आले. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर, आज कित्येक नवख्या तरुणांना व्यवसायात य़ेण्यासाठी उद्युक्त करते आहे. लोकाभिमुख सेवा हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असे ते सांगतात. केवळ तीन वर्षात ग्राहकांची पसंती मिळवण्यात निलेशला यश मिळाले, मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

निलेश अभंग यांचे प्राथमिक शिक्षण नेतिवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी कल्याण येथील कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूलमध्ये गेले. लहानपणापासून शिक्षण आणि वाचनाची आवड असल्याने  वर्गात अव्वल क्रमांकावर राहायचे. शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत सतत प्रथम क्रमांकावर असायचे. कुटुंबात धाकट्या दोन बहिणी, आई-वडील. सुरुवातीपासून परिवाराची आर्थिक परिस्थीती तोळामासाच. त्यामुळे हायस्कूलच्या शिक्षणात अनेक अडचणी येत. आईचा पुर्ण पाठिंबा आणि निलेशजींच्या जिद्दीमुळे मार्ग निघत गेले.

अगदीच इयत्ता नववीपासून ‘कमवा आणि शिका’ या ब्रीदवाक्याचा नाइलाजाने त्यांना अंगिकार करावा लागला. नववीनंतरच्या शालेय सुट्ट्यांमध्ये कुरिअर कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले. चौदा वर्षांचा लहानगा भर उन्हाळ्यात कल्याणहून सायकलने मधल्या रस्त्यातील गावांमध्ये कुरीयर टाकत बदलापुरात पोचत असे. अन् बदलापुरातील कुरीयर पोचवल्यावर कल्याणच्या दिशेने आपल्या सायकलीवर परतीच्या प्रवासाला निघत असे. (कल्याण ते बदलापुर रस्त्याने अंतर साधारणत: १८ किलोमीटर आहे.) अशाप्रकारे तीन महिने सातत्याने काम करुन दरमहा मिळालेल्या पगाराची रक्कम दहावीच्या शिक्षणासाठी राखून ठेवली. या कामामुळेच दहावीचे शिक्षण करता आले. शालेय शिक्षण घेत असताना शिक्षिका लोखंडे बाई व इंग्रजी विषय शिकवणारे शिंदे सर यांचा विशेष प्रभाव पडला.

आर्थिक स्थिती सुधारावयाची असल्यास शिक्षण घेतलेच पाहिजे, याची पक्की जाणीव निलेश यांना त्या वयातही होती. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता, वाचनामुळे मराठी भाषेची उत्तम समज तयार झाली होती, त्यामुळेच शाळेत आणि शाळेबाहेरही विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत असत. तसेच दहावीसुद्धा प्रथम वर्गात पास झाले.

  पुढे बिर्ला महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अचानक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने निलेश यांच्यावर काम करण्याची वेळ आली अन् अकरावीमध्येच अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागेल. मग या काळात त्यांनी वृत्तपत्र विकणे, मेडिकलमध्ये काम करणे, प्रेसमध्ये बाइंडिंगची कामे करणे असे नाना तऱ्हेची कामे केली. शिक्षण पुर्णत: ठप्प झाले होते. तीन वर्षे पडेल ती कामे करत कुटुंबाला हातभार लावत राहिले. सकाळच्या वेळेत स्टेशनचा पेपर स्टॉल चालूच होता, दिवसा मागून दिवस जात होते आणि निलेशजींमध्ये अन् शिक्षणात अंतर पडत होते. शिक्षणाची आवड होती, परंतु परिस्थिती परवानगी देत नव्हती, तेव्हा अशा वेळेत संगीता हसे ह्या बहिणीने निलेश यांना "पुन्हा शिक्षण सुरू कर" असा सल्ला दिला आणि तो सल्ला मानून तीन वर्षांच्या गॅपनंतर बारावी १७ नंबरचा  फॉर्म भरुन परिक्षा दिली आणि ७०% गुण मिळवून पास झाले. त्यांच्या सर्व हितचिंतकांना फार आनंद झाला. शिक्षणाच्या रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

खुप विचारांती B.M.M (Bachelor in Mass Media) करण्यासाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु अडचणी पाठ सोडत नव्हत्या. पहिल्याच सत्रात A.T.K.T.  लागली. कारण होते इंग्रजी! अनेक मराठी माध्यमांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा फार गोची करते. मात्र निलेशरावांचा स्वभाव माघार घेण्याचा नसल्याने इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली. नियमित इंग्रजी वृत्तपत्र वाचन, पुस्तके, आणि मित्र यांच्या साह्याने तीन महिन्यात निलेश उत्तम इंग्रजी बोलू लिहूही लागला.

बिर्ला महाविद्यालयात अकॅडमिक्समध्ये निलेश यांची प्रगती होतच राहीली. अभ्यासात आलेख उंचावतच राहिला. कॉलेजमध्ये असतानाच पुकार (PUKAR,  HYPERLINK "http://www.pukar.org.in/" Partners for Urban Knowledge, Action and Research) या एनजीओच्या वतीने त्यांना सतत दोन वर्षे फेलोशीप्स मिळाल्या. कॉलेजमध्ये फेलोशीप प्रोजेक्टमध्ये असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा समन्वयक होण्याचा मान त्यांना मिळाला.

आर्थिक चणचण पाचवीलाच पुजली असल्याने महाविद्यालयात असताना खर्च भागवण्यासाठी निलेश यांनी पॅन कार्ड बनवून देण्याची एजन्सी घेतली. अन् त्यातील मिळकतीतूनच कुटुंबालाही हातभार लावत राहिले. सतत अभ्यास आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी असल्याने ग्रॅज्युएशनला उत्तम गुणांनी पास होत प्रथम श्रेणी मिळवली.

पत्रकारितेत पदवी प्राप्त केल्यानंतर DNA या इंग्रजी वृत्तपत्रात निलेश हे पत्रकार म्हणून रुजू झाले .पत्रकार म्हणून निलेश यांनी फक्त चार महिने काम केले आणि पुढे पुणेस्थित MNC मध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळाल्याने तेथे बस्तान हलवले. तेथील एका वर्षाच्या वास्तव्यात नोकरीतील कामाच्या रटाळ पद्धतीला निलेश कंटाळले. बारा तासाची नाइट शिफ्ट शरीराचे आरोग्यचक्र बिघडवून टाकत होती. काहीतरी नवीन करण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी एका वर्षाने धाडस एकवटून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला अन् कल्याणला पुन्हा व्यवसाय करण्याच्या इच्छेने आले. वर्षभरातील नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर पडली होती. आधीच तुटपुंज्या उत्पन्नाचे असलेले काम वडिलांनी थांबवले होते. हा निलेशजींच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा काळ होता.  

मात्र व्यवसायाला भांडवल लागते अन् तेथे घोडे अडले. त्या भांडवलउभारणीसाठी तब्बल आठ महिने ठाणे ते कर्जत-खोपोली, कल्याण ते कसारा, या दरम्यानच्या स्टेशनांतील भागांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शाळांमध्ये दहा रूपये किंमत असलेले काळांचे तक्ते (English Tense Chart) विकले. त्यातुन मिळवलेली पुंजी आणि घरात असलेले सोने तारण ठेवले. काही मित्रांनी त्यांना सढळ हस्ते बिनव्याजी काही रक्कम उसनवारीने दिली.

अशाप्रकारे रक्कम जमवून 'गॅलक्सी नेट कॅफे’ या नावाने १ सप्टेंबर, २०१३  रोजी निलेश अभंग यांनी व्यवसाय सुरू केला.  इंटरनेट सेवा लोकांना देण्यासाठी हे नेट कॅफे नेतिवली परिसरात सुरू करण्यात आले. अथक परिश्रमांनी सर्व जुळवाजुळव करुन सुरु केलेल्या कॅफेला थोडाफार प्रतिसाद मिळत होता. व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली होती, मात्र सायबर कॅफेच्या परवान्याचा अर्ज शासकीस प्रक्रियेत असताना परवान्यासाठी स्थानिक पोलीसांनी विचारणा केली. आणि सदर अर्जाची हालहवाल सांगितल्यानंतर, तुम्हाला परवाना येईपर्यंत व्यवसाय करता येणार नाही, असे सांगितले गेले आणि कोर्टात खटला दाखल होवून व्यवसाय सुरुवातीच्या दिड महिन्यातच बंद झाला.

पुढे काय करावे हा प्रश्न मनात घेवून निलेश यांनी पोलीस स्टेशन गाठले तेथे त्यांना पोलीस जनार्दन सानप हे म्हणाले, " अरे अभंग ! तू पत्रकार माणूस, तुला असा उद्योग करायची काय गरज आहे, काही तरी चांगला कायदेशीर उद्योग कर की.”

त्या संभाषणातून निलेश यांनी ठरवले की इंटरनेट कॅफेचे काम बंद करायचे. अत्यंत कष्टाने कमावलेल्या पैशांनी घेतलेले सहा संगणक भंगारमध्ये विकावे लागले. गॅलेक्सी नेट कॅफेच्या जागी सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर असा शॉपचा बोर्ड लावण्यात आला.

एक स्कॅनर,  एक प्रिंटर, एक कम्प्युटरच्या साहाय्याने सत्यमच्या कामाला सुरुवात झाली. ग्राहकांच्या प्रिंट आउट्स काढून देणे, त्यांची कागदपत्रे स्कॅन करणे, त्यांना काही महत्त्वाचे इमेल्स पाठवण्यासाठी कम्प्युटरचा काही मिनिटांकरीता वापर करु देणे, अशा कामांनी सुरुवात झाली. त्याचबरोबर शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेद्वारांचे ऑनलाईन अर्ज भरणे, पासपोर्टचा फॉर्म भरणे, आधार कार्ड ऑनलाईन दुरूस्त करून देणे, रिक्षा परमिटचे ऑनलाईन अर्ज भरणे, इत्यादी कामे या सेंटरवरुन होऊ लागली. ग्राहकांची रेलचेल चालू झाली. ऑनलाईन असलेले शासकीय एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी विद्यार्थी दूरुन येऊ लागले. निलेशजींच्या संयम आणि सहनशीलतेला यश मिळू लागले होते. पुढे या केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत केंद्राचा परवाना मिळाला. कामाची चोख पद्धत आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे सेंटर अल्पावधीतच कल्याण तालुक्यात लोकप्रिय झाले.

ग्राहकांची संख्या वाढल्याने तत्पर सेवा देण्याकरीता निलेशजींनी उत्तम टीम उभारली. आज एकूण सात जणांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटरची टीम ग्राहकांना सेवा देण्यास सदैव तत्पर असते.    
     
         कल्याण पूर्व मधिल अधिकृत शासकीय कागदपत्रे बनवण्याचे ठिकाण म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटरला शासनाने मान्यता दिलीच, मात्र नागरिकांनी गेल्या तीन वर्षात सातत्याने सेंटरला कामानिमित्त हजेरी लावून त्यांच्या विश्वासाची मोहोर सत्यमवर उमटवली. आज ठाणे जिल्ह्यातील ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टमध्ये सर्वात जास्त कार्यरत असलेले सेंटर म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटर गणले जाते. अत्यंत योग्य दरात काम करणे व लोकाभिमुख सेवापद्धतीमुळे नागरिकांचा ओढा सत्यमकडे असतो.

निलेशजी इतर सेंटर चालकांना सतत मदत करत असतात. त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडवण्यात सतत अग्रभागी असतात. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील ई-सेवा केंद्र चालकांना शासनाच्या विविध सेवांचे प्रशिक्षण विनामूल्य देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा कित्येक सेंटर चालकांनी उपयोग करुन स्वत:च्या व्यवसायात भरघोस वाढ केली आहे. या सेंटर चालकांना प्रशिक्षित करुन शासनाच्या विविध योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवणे, हेच निलेश अभंग यांचे उद्दीष्ट आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व महा-ई सेवा केंद्र आणि शासनाच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्ससाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्याचा निलेशरावांचा मानस आहे.

संपर्क : ८९७६६२५६९५, Email Id – nileshabhang5@gmail.com

7 comments:

  1. Wish you very good luck and god may fulfill your all best wishes and targets ay the earliest
    Mangesh Wadekar
    Kalyan

    ReplyDelete
  2. शेतकरी मित्रांसाठी असा एक ब्लॉग तयार करायचा आहे. तरी ब्लॉग कसा तयार करतात याबद्दल माहिती हवी आहे.

    ReplyDelete
  3. निलेश,ही तर कुठे सुरूवात आहे.तुझ्या स्धस्वाभिमानी आणि धडपड्या स्वभावामुळे तुला यश मिळणे अनिवार्य आहे.तू आता अशा धडपड्या तरूणांचा role model बनणार आहेस.माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी असतील.यशस्वी भव ||

    ReplyDelete