Sunday, 30 October 2016

गणेश तानाजी जगताप खेळाला न्याय देणारा... राष्ट्रीय खेळाडू


गणेश तानाजी जगताप
खेळाला न्याय देणारा... राष्ट्रीय खेळाडू.

                गणेश यांचे प्राथमिक शिक्षण गणेश विद्या मंदिर शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ज्ञान मंदिर शाळेत प्रवेश घेतला. अभ्यासापेक्षा खेळात मन रमत होते कब्बडीचे सामने पाहण्यासाठी मैदानावर वारंवार जात असत. हनुमान सेवा मंडळ,सन्मित्र क्रिडा मंडळ ह्या सामन्याचे आयोजन करीत असत,तेव्हा श्रोते म्हणून सामन्यात जात होते आणि तेव्हापासून कब्बडीने मनात घर केले . मैदानावर जावून खेळ खेळणे या साठी गणेश यांना मदत झाली  सखाराम चव्हाण यांची ते  गणेश यांना मैदानावर  घेऊन गेले. आणि प्रवास सुरू झाला एका राष्ट्रीय खेळाडूचा .पुढे दररोज कब्बडीचा सराव करण्यासाठी हनुमान सेवा मंडळात गणेश जायला लागले. जो काही मैदानावर सराव करीत तो चाळीत आल्यावर मित्राना बरोबर घेऊन करीत. दररोज संध्याकाळी वडील अभ्यासाला घेऊन बसायचे,अभ्यास व खेळ असा नित्यक्रम बनला होता.


             कब्बडीचा पहिला सामना हनुमान सेवा मंडळाच्या वतीने गणेश यांनी खेळला तेव्हा ते इयत्ता पाचवीत शिकत होते. त्याच वेळी त्यांची ठाणे जिल्हा किशोर गटासाठी निवड करण्यात आली. पुढे सतत तिन वर्षे चमदार कामगिरी करत गणेश आपल्या अष्टपैलू खेळा ने सर्वांना मोहून टाकत होते. ह्या तीन वर्षात महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात खेळ करत होते. ह्यात घरातील सदस्याचा पाठिंबा होताच. खेळा मुळे आनंद , ऊर्जा,  ऊत्साह, मिळत होता लहान पणा पासून गणेश हे प्रसिद्धीच्या झोतात राहिले.
खेळ आणि अभ्यास याचा योग्य ताळमेळ रहावे यासाठी एक वेळापत्रक बनवण्यात आले होते आणि त्या वेळापत्रकाचे गणेश हे काटेकोरपणे पालन करत असत. हेच यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे .
             
         
           शाळेत मराठी, इतिहास, भूगोल हे विषय अधिक प्रमाणात आवडत होते तर शाळेत कदम सर,कुलकर्णी सर , दांडेकर सर यांचे मार्गदर्शन गणेश यांना लाभले प्रत्येक शिक्षक आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होते. शाळेला राज्यस्तरीय शालेय कब्बडी चषक या स्पर्धेत शाळेला द्वितीय स्थानावर नेले.

               शाळेय शिक्षणानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गणेश हे उल्हासनगर येथे R.K.T. महाविद्यालयात गेले असता तेथे प्रवेश नाकारला कारण होते ते कोळशेवाडीत राहायचे. नंतर कल्याण येथे बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले असता जो प्रकार घडला तो अकल्पित होतो. " अरे गण्या .... मी तुझी वाट बघतोय ये बस इथे  "अस बोलत होते ते बिर्ला महाविद्यालयातील खेळ प्रशिक्षक प्रशांत दुमडे सर . सरांनी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली तो पर्यंत गणेश यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला 'हे ! सर मला कसे ओळयतात ?' ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एक कब्बडीचा सामना ......
जय भारत कळवा येथील सामन्यात N.R.C संघ विरूद्ध हनुमान सेवा मंडळ असा सामना रंगाला होता ,N.R.C हा संघ पाच गुणांनी आघाडीवर होता , गणेश हे बाद होवून  बाहेर बसलेले होते, नरेश कदम यांनी एक गुण मिळवला आणि गणेश आत आले आणि बघता बघता पुढिल पाच मिनिटात नऊ गुण घेऊन हनुमान सेवा मंडळ जिंकले कोच म्हणून सर सामना पाहत होते म्हणून गण्या हा विषेश लक्षात राहिला. हाच गणेश आता महाविद्यालयाच्या संघात खेळणार  ह्या जाणिवेने ते अंत्यांतीक  आनंदी झाले. महाविद्यालयाच्या वतीने खेळत असताना प्रथम वर्षा पासूनच चांगली कामगिरी करण्यात आली परंतु संघाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. परंतु पुढिल वर्षी संघाने उत्तम कामगिरी करत राज्यस्तरीय अंतिम फेरी गाठली आणि महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक नेले.
                गणेश हे कुमार गटात खेळू लागल्यावर पहिल्याच वर्षी हनुमान सेवा मंडळाने  जिल्हा स्तरावरील स्पर्धेत अंतिम फेरीत गाठली व अटीतटीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि त्याच वर्षी राज्यातील संघात गणेश यांची निवड करण्यात आली. अठराव्या वर्षी सेंट्रल रेल्वे च्या राष्ट्रिय संघात निवड झाली, आणि तेथेच  नोकरीत सुद्धा रूजू झाले. रेल्वेत
खेळत असताना संपूर्ण भारतात दौरे करीत असत महिन्यात दोन दौरे नक्की असत . या दरम्यान अनेक चषक त्यांनी आपल्या संघाला मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला या सर्व प्रवासात यशाचे गमक हे खेळ , व्यायाम, आहार,आराम हीच चतृसुत्री. तसेच वेळापत्रकाचे विषेश महत्त्व होते,  वेळापत्रकाचे काटेकोरपणे  पालन गणेश सदैव करीत होते. कल्याण पूर्व मधिल अनेक खेळाडूचा प्रभाव यांच्या वर होता .आज गणेश जगताप यशस्वी आहेत ते कै . अनिल कर्पे, रमेश देवाडीकर, व सुरेश चव्हाण यांच्या मुळे.
          100 % खेळात लक्ष , कबड्डी शिवाय डोक्यात काहीही नाही, यासाठी घेतलेली मेहनत, उदाहरणार्थ जाॅगिंग साठी सकाळी 4.30 ला सुरुवात करत होते जाॅगिंग चा मार्ग पुढील प्रमाणे असायचा. गणपती मंदिर ------- > विठ्ठलवाडी -------> श्रीराम टाॅकिज -----> काटेमानिवली नाका --------> चक्किनाका --------> काटेमानिवली नाका ----> हनुमानवाडी . 1000 ते 2000 दोरी उड्या असा व्यायाम सातत्यपूर्ण करीत असत .यात मार्गदर्शकाची भुमिका महत्त्वाची होती, मार्गदर्शक म्हणून कै. गणेश पोळ, कै .सुरेश काळे , आंनद दिघे लाभले.          कुटुंबातील सदस्याचे योगदान पण मोठेच होते.  वडीलान कडून इमानदारीने काम कसे करावे याचे धडे भेटले तर आई कडून सर्वावर प्रेम करणे .बहिणीकडून नेहमी आनंद मिळाला, सर्वांना बरोबर घेऊन कसे चालावे हे बहिणीने शिकवले. 5 जानेवारी 2005 रोजी गणेश यांनी त्यांच्या रेखा नावाच्या मैत्रीणी बरोबर प्रेम विवाह केला. पुढिल सार्वजनिक कार्यात रेखा ह्या गणेश यांच्या मागे ठामपणे उभ्या असतात. मुलगा आर्यन यांच्या अभ्यासाची जबाबदारी आई कडे असते.

         हनुमानवाडी कला,क्रीडा, व सामाजिक संस्था मार्फत राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धचे आयोजिन करण्यात आले ,प्रेम शुक्ला यांच्या साह्याने व राणाप्रताप तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाल्या.
ही स्पर्धा पुर्ण झाली. प्रथमच 12 फ्रेबुवारी 2015 ला  कोळशेवाडीत व्यावसायिक साखळी सामने आयोजित केले गेले , या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सामना ठरलेल्या वेळेतच सुरू झाला,आणि नंतर प्रमुख पाहुणे आल्यावर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण राज्यात क्रीडाप्रेमी कडून कौतुक करण्यात आले. तसेच संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात.या संस्थे मार्फत गणेश जगतात आपले सामाजिक कार्य करीत आहेत.

                 रेल्वेत  18 वर्षा पासुन कार्यकरीत असतांना गणेश यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वची छाप पाडली सुरवातीच्या काळात टिकिट तपासणी  करत असतांना लोकांना खर वाटत नव्हते, प्रवासी तपासणी साठी नकार देत होते, हे पुढे 2 -3 वर्ष चालल. कांतीलाल वरडिकर, संजय कराळे,कुठेकर आणि इतर सहकारी यांची फार मदत होत होती. नंतर  5 वर्षानंतर गणेश यांची विशेष पथकात नियुक्ती झाली .तिथे जसपाल राठोड,  सुधीर कामत यांचे मार्गदर्शन लाभले.
   गणेश हे आता कबड्डी पटूना मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षक म्हणून नविन खेळाडूंना आपल्या ज्ञानाचा फायदा करून देत आहेत.
 
वाचकांसाठी संदेश ::--
                             आयुष्यात खूप  मेहनत करा, इमानदारीचे फळ मिळतेच, काम करून प्रसिद्ध व्हा प्रसिद्धी साठी काम नका करू.

कोळशेवाडीसाठी संदेश ::-----
                    कोळशेवाडीत जन्माला आलो भाग्यच !! कोळशेवाडी कोणत्याही संकटाच्या वेळी एक होते. कोळशेवाडीचा अभिमान आहे.

Saturday, 22 October 2016

रूपेश रविंद्र गायकवाड - कल्पक भाऊ....


रूपेश रविंद्र गायकवाड
             कल्पक भाऊ....
 
 बालपणापासून आजोबांन बरोबर कीर्तनाला जाणे,  सांस्कृतिक कार्यक्रमात रुची , यामुळे वेशभूषास्पर्धांमध्ये संत ज्ञानेश्वरा पासून संत तुकाराम पर्यंत स्वामी विवेकानंद यान सारख्या राष्ट्रसंताच्या व्यक्ती रेखा रेखाटणे असो रूपेश सतत पुढे. आजोबा बरोबर कीर्तनाला जाण असो की विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला रूपेश आजोबांन सोबत . यामुळे वारकरी संप्रदायाचा ठसा त्या बालमनावर उमटचत होता.

                      नूतन ज्ञान मंदिर या शाळेत रूपेश यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शाळेत असताना आवडते विषय दोन मराठी व इतिहास त्यात सोबतीला विज्ञान प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यात हौशी सहभाग . पुढे नविन छंद सुरू झाला तो म्हणजे कविता करणे. विद्यार्थ्यां जीवनात ताम्हणकर मॅडम व मनसुळकर सर यांचा प्रभाव रूपेश यांच्या वर अजूनही आहे.  शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी R.K.T. महाविद्यालयात प्रवेश घेतला येथे ही अभ्यासक्रमासोबत सांस्कृतिक उपक्रम होतेत महाविद्यालयात होणाऱ्या गायन स्पर्धेत यश संपादन केले. H.S.C विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी भिवंडीतील शहा आदम शेख फार्मसी काॅलेज मध्ये प्रवेश घेतला. येथे औषधा बरोबर 'तहबीज' शिकायला मिळाले. कविता करणे आणि सादर करणे हातर छंदच म्हणून तर मुशावराच्या कार्यक्रम रूपेश यांनी 'भारत माझा देश आहे ' ही कविता सादर केली आणि मग काय गोंधळ, भांडण, त्याचे रूपांतर मारामारीत जातीय दंगली होतील म्हणून पोलीस रूपेश यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये. बाबा पोलीस ठाण्यात आहे आणि रूपेश यांना घरी घेऊन आले. औषध व त्यांचे रंग यावर संशोधन करून अभ्यासातील सोपी पद्धत तक्याच्या स्वरूपात निर्माण केली .आणि आपल्या मित्रांना सुद्धा शिकवले अजूनही तो तक्ता महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आहे. पुढील शिक्षणासाठी ठाण्यातील मुच्छना महाविद्यालयात प्रवेश घेतला.

 2006 मध्ये रक्षा फार्मसी नावाने औषधांचा व्यापार सुरू केला . वडील यांनी सुरवातीला भांडवल दिले. व्यवसाय सांभाळताना सुरवातीचे दोन वर्षे रूपेश यांचा कस लागला. या दरम्यान वडीलांनी सुरू केलेले सार्वजनिक गणपती मंडळाचे २१वे वर्षे होते त्याच वर्षी वडीलांनी रूपेश यांच्या वर मंडळाची जबाबदारी टाकली .दिलेली  जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे रूपेश यांचे कौशल्यच. ह्या संधी चे सोने करत आपल्या सार्वजनिक सामाजिक कार्याची सुरवात  केली. सामाजिक बांधिलकीची विषेश जाणिव असणारे आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे आपल्या कृतीत रूपेश यांनी आणून दाखवले. रक्तदान,  स्त्री भ्रूण हत्या व अन्य अनेक सामाजिक विषय  गणेश उत्सवात मांडले. स्त्री भ्रूण हत्या या विषयाला तब्बल अकरा पारितोषिके २००७ मध्ये मिळाली. पुढे २०१० मध्ये कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी रूपेश यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोळशेवाडीतील हा तरूण अध्यक्ष झाला कोळशेवाडीत पहिल्यांदाच हे अध्यक्ष पद आले.

           अशा ह्या हरहुन्नरी तरूणा वर राजकारण्याची नजर पडली आणि आणि रूपेश यांचा राजकीय प्रवास गणपत गायकवाड यांच्यासोबत सुरू झाला. ह्या हिऱ्याची पारख नंतर  राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष निलेश शिंदे यांनी केली.रूपेश जिल्हाअध्यक्ष झाले. आणि रूपेश यांच्या कल्पना राष्ट्रवादी च्या मोठमोठ्या  कार्यक्रम बघायला मिळाल्या. रास्ता रोको आंदोलन असो की राष्ट्रवादी निर्धार मेळावा, आरोग्य शिबीर आयोजित करणे, रस्ता सुरक्षा अंतर्गत 'यम है हम' , तसेच अनेक निदर्शने.
राजकारणात गुरू म्हणून लाभले ते माननीय आमदार जगन्नाथ  (आप्पा ) शिंदे आणि माजी खासदार आनंद परांजपे. राजकारणात युवक कसा असावा ? याचे आदर्श प्रतिबिंब रूपेश यांनी समाजात उभे केले.
       रुपेश यांची अजून एक आवड म्हणजे गड किल्ले मोहीम ..तरुणांना घेऊन जाणारे रुपेश २०१३ मध्ये जेव्हा चालत पायी दिल्ली नारायण आश्रम नेपाळ चीन बॉर्डर तिबेट करत कैलास मानस सरोवर गेले हा प्रवास त्यांचा तोंडूनच ऐकावा.
 

 सांस्कृतिक परंपरे बरोबर सामाजिक विचार धारा देखील महत्त्वाची आहे . समाजापुढे अनेक प्रश्न आणि समस्या आहेत या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाज परिवर्तनाची हाक देण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०१४ रोजी श्री गणेश तरुण मित्र मंडळ तसेच सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कल्याण पूर्व यांच्या सहयोगाने गुरुवर्य श्री शांतीलाल दहिफळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ श्री अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते कल्याण पूर्व बासरीवाला पारंपरिक ढोल ताश्या पथकाची स्थापना रुपेश यांनी केली.
                 सामाजिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा या दोन्ही बाजू ढोल ताश्या पथकाच्या  माध्यमातून पुढे नेण्याचा पहिला प्रयत्न केला तो , १९७० च्या दशकात पुण्यनगरीच्या ज्ञानप्रभोधिनीच्या माध्यमातून अप्पासाहेब पेंडसे यांनी . आधुनिकतेच्या नावाखाली सामाजिक जाणिवा  आणि सांस्कृतिक वारसा विसरत चालेल्या तरुणाईला ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून एकत्र करून एक सामाजिक व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता . पण व्यवसायिक युगात त्यांना सामाजिक भान किती राहिले हा  तसा न सुटणार प्रश्न . परंतु हा सामाजिक जाणिवेचा विचार पुढे नेऊन मराठी आणि अमराठी तरुणांना एकत्र करून सामाजिक विषय ढोल ताश्याच्या माध्यमातून सादर करून समाज जनजागृती करण्याचा रुपेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमी प्रयत्न केला  .
                  कल्याण पूर्व बासरीवाला पारंपरिक ढोल ताशा पथकाने आतापर्यंत कल्याण , आणि आसपासच्या  उपनगरात तसेच महाराष्टात आणि महाराष्टा बाहेर आपली कला सादर करून लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे . अनेक स्पर्धे मध्ये सन्मान मिळवला आहे . पुणेरी ठेक्यानं सोबत अनेक ढोलकी संभळ अश्या पारंपारिक वाद्याचा उपयोग करून शूर शिवबा , मानवता आणि धर्म , पर्यावरण , गोंधळ , भारूड , जगाच्या पोशिंद्याची करून कथा या विष्यानवर वादन केले आहे . अश्याप्रकारे  वादनात विविधता आणताना पथक सामाजिक कर्तव्य विसरले नाही .
                 सामाजिक कार्याला प्रथम स्थान देणारे हे पथक अवघे १२ ढोल घेऊन सुरु झाले होते . पण आज ३० ढोल १० ताशे अशी झेप घेत उच्च दर्जाच्या वादनासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवत रसिक प्रेक्षकांन समोर सातत्याने येत आहे. भगत सिंग राजगुरू सुखदेव यांची जयंती पुण्यतिथी ,छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज जयंती पुण्यतिथी , पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांना सोबत विशेष वादन , १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिम्मित " सलाम कलाम" हि संकल्पना घेऊन शाळेतील विध्यार्त्यांन सोबत अनोखे वादन , महाराष्टातील शेतकरी राज्यासाठी z २४ तास च्या माध्यमातून ८ शेतकर्यांना आर्थिक मदत , साई पालखी सोबत शिर्डी ला जाणाऱ्या साई भक्तांना वाटेत लावण्यासाठी वृक्षांचे वाटप , रिक्षा चालवून आपल्या पाल्याला उच्चशिक्षित करणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार , २६ जुलै, कारगिल विजय दिवसानिमित्त भारतीय सैनिक विदयालय खडवली येथे स्फूर्ती यात्रा ..... सलाम भारतीय सैन्याला  हा विशेष उपक्रम असे अनेक उपक्रम पथकाने  मनापासून राबिवले आहेत.
                 पथक हातात ढोल घेऊन असे समाजउपयोगी उपक्रम राबवत असतानां कधीच मागे हटले नाही कारण ढोल ताश्यांची नशा काही ओरचं  आहे . पण एकीकडे समाजात असे पण महाभाग आहेत ज्यांना ढोल वाजवणं हे योग्य वाटत नाही . तशी तर हातात काठ्या बंदुका घेऊन रस्त्यावर यावे अशी इच्छा होते पण यांना  यांचे संस्कृती  परवानगी देत नाही . म्हणून  हा ढोल हातात घेऊन समाजउपयोगी कार्य करून समाजपरिवर्तनची हाक देत आहोत असे रुपेश यांनी सांगितले.

               "खूप काम कसे करायचे" हे रूपेश त्याच्या बाबांकडून म्हणजे रविंद्र गायकवाड यांच्या कडूनच शिकले. रूपेश याचे बाबा व त्यांचे नाते मैत्री पलीकडे होते. बाबान विषयी बोलताना माझे बाबा माझे वटवृक्ष असे म्हणतात. माझ्या प्रत्येक कामात बाबांचा नेहमीच  पाठिंबा राहिला. आई कडून प्रेम आणि सहनशीलता हे गुण आले. तर भावंडानकडून ही शिकायला मिळत आहे बहिणी ह्या खूप प्रेमळ असून समजून घेतात. लहान भाऊ अक्षय हा संवेदनशील आहे, सर्वाना घेऊन कस चालावे हे अक्षय कडून शिकायला मिळते. डॉक्टर अरविंद यांनी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई दाखवली,कृतीयुक्त दृष्टिकोन कसा असावा ह्याचे  बालकडू पाजले. कुटुंबाप्रमाणे मित्रान कडून खूप काही  शिकायला मिळाले असे रूपेश सांगतात त्यात संदिप तांबे असतील किंवा सार्वजनिक शिवजयंती तील नाना म्हणजे नरेंद्र सुर्यवंशी असतील . कलाक्षेत्रातील चित्रकार प्रल्हाद ठाकूर , सुशील कटारे असो की पथकातील मित्र असो की समाजातील रूपेश यांना मैत्री करणे आणि जपण्याचा छंदच आहे.


 वाचकांसाठी संदेश :--
                            आपण प्रत्येकानी आपली आवड  वेळात वेळ काढून ती जपली पाहिजे . छंद जपा आणि वाढवा मग जगातील इतर  सर्व गोष्टी लहान वाटायला लागतात.

कोळसेवाडीसाठी संदेश :---
                                     सुर्या ने उठवण्यासाठी पुर्व दिशा निवडली आहे. आपण सातत्याने काम करत राहूया सुर्याद्यय नक्की होईल.

Saturday, 15 October 2016

डॉ. नम्रता जाॅन जोसेफ - देशमुख. जागर ...... स्त्री शक्तीचा


डॉ. नम्रता जाॅन जोसेफ - देशमुख.
 जागर ...... स्त्री शक्तीचा.

           भगवत गीता समजण्यासाठी वाचायला पाहिजे असे क्रमप्राप्त नाही. कर्मयोग काय असतो ? तो आमच्या वडीलांच्या कार्यातून आम्हाला पदोपदी बघायला मिळत असे . अस सांगणार्‍या डाॅ.नम्रता यांचा जन्म उल्हासनगर मधील एक उद्योजक श्री ना ना देशमुख यांच्या घरात झाला. ना.ना देशमुख हे समाज सेवक देखील होते . नम्रता यांनी शालेय शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल येथून पुर्ण केले. शाळेतील मैदानी खेळात त्या हिरिरीने सहभाग घेत असत मग ते कबड्डी, खोखो धावणे असो की सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे नम्रता नेहमी हजर. इयत्ता दहावीत त्यांनी शाळेत तृतीय क्रमांक पटकावला. पुढिल शिक्षण घेण्यासाठी उल्हासनगर मधिल C.H M. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

नम्रता ह्या महाविद्यालय शिक्षणा बरोबर National Cadet Core  ( NCC) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. N.C.C तील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च असलेला Rupablic day Camp साठी निवड झाली R.D. परेड म्हणजे  26 जाणेवारी ला लाल किल्ला ते इंडिया गेट दरम्यान जे भारतीय सैन्याचे संचलन होते त्यामध्ये त्यात NCC ची एक तुकडी असते त्यात भारतातील सर्व राज्यातून NCC CADETS  निवडले जातात त्यात न्रमता यांची निवड झाली. 26 जानेवारी 1991 मध्ये राजपथावर संचलन केले ही घटना त्याच्यासाठी गौरवास्पद होती त्याच बरोबर कुटुंब, महाविद्यालय,आणि बटालियन साठी गौरवशाली होती. देशभक्ती आणि शिस्त NCC च्या माध्यमातून त्याच्यात अवतरल्या.

1994 मध्ये B.sc ची पदवी संपादन केली आणि त्याच वर्षी विप्रो या नामांकित कंपनीत फिल्ड सुपरवायझर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाल्या या पदावर काम करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या मुलाखतीच्या वेळेस अनेक प्रश्न विचारले गेले त्यातील काही प्रश्न त्या स्त्री आहेत म्हणून विचारले गेले होते.  उदाहरणार्थ " पन्नास किलो वजनाची बॅग उचलू शकाल का  ? , fild वर एकट्या जावून काम कराल का ? " यां प्रश्नांची उत्तरे  त्यांनी दिले आपल्या कामातून . कामात त्या पुरूषांन पेक्षा कधिच कमी पडल्या नाही त्या त्यांनी सिद्ध केले की  स्त्री हि पुरूषांन बरोबर काम करू शकतात. पुढे  1997 मध्ये नम्रता यांचा जाॅन यांच्याशी प्रेम विवाह झाला. गरोदर पणा मध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आणि त्याना नोकरी सोडावी लागली. याच काळात तब्येतीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या,  त्यात वाढ झाली पुढे याच मुळे असह्य त्रास झाला. एक वेळ अशी आली की आई व बाळ यांच्या जिवाला धोका निर्माण झाला या जीवघेण्या प्रसंगातून त्या स्वतः सावरल्या आणि त्यांनी मानसी नावाच्या गोड मुलीला जन्म दिला. पुढे तिचे संगोपन करीत असतांना शिक्षण घेण्याच्या महत्वाकांक्षेला आवर घालणे कठीण होते त्यांनी 1998-99 मध्ये B.ed.पूर्ण केले.


 स्त्री जीवन म्हणजे संघर्ष व या संघर्षातून मार्ग काढत नम्रता आता शाळेतील शिक्षिकेच्या भुमिकेत आल्या होत्या. कल्याण पूर्व भागातील L.K.P.SCHOOL या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. वर्ग शिक्षिका व प्रयोगशाळा परिक्षक या जबाबदार्‍या होत्या त्या त्यांनी पार पाडल्या, शालेय शिक्षण पुस्तकी न ठेवता विद्यार्थ्यांसाठी  अभ्यास सहली , क्षेत्र भेटी, आयोजित  केलेल्या  त्यात B.A.R.C. , सायन्स सेंटर, नेहरू सायन्स सेंटर, हे कार्य त्यांनी  2000-2006 पर्यंत केले.

       बालपणापासून जिवणात आलेले अनुभव आणि अनुभूती यातून त्यांच्यातील समुपदेशक निर्माण झाला व 2010 मध्ये मेटा सोलूशनची सुरवात करण्यात आली .
कार्य वाढत चालले होते . आपणही समाजाच देण लागतो या भावनेतून मेटा फाऊंडेशन ची स्थापना झाली.
डॉक्टर नम्रता यांनी आज पर्यंत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, चंदिगढ, या ठिकाणी 500 हून अधिक कार्यशाळा घेण्यात आल्या. याच बरोबर कल्याण  पूर्व विभागातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या कार्यालयात IQ आणि  EQ मूल्यमापन चाचण्या घेतल्या जातात .तसेच ताणतणाव व्यवस्थापन, अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन, त्याचबरोबर महिलांसाठी सकारात्मक आनंददायी जिवन जगण्याचे मार्गदर्शन दैनंदिन जीवनात समस्येवर मात कशी करायची ? याच बरोबर व्यवसायीक प्रशिक्षणात मॅटा सोलुशन कार्य करीत  आहे. मानवी जिवण हे अनुभव घेण्यासाठी आहे आणि शिक्षणाने तो अनुभव प्राप्त होतो. कोणत्याही विधायक कामाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, प्रत्येकात काहीनाकाही गुण आहे आणि हे गुण ओळखूनच आपण आपले जीवन साध्य केले पाहिजे हे डाॅ.नम्रता यांचे मत व या तत्त्वावर मेटा सोलूशन काम करते.


          मुलगी मानसी आणि मुलगा जयडन यांच्या कडूनच जिवन जगण्याची प्रेरणा डाॅ.नम्रता यांना प्राप्त होते. आपल्या व्यस्त जिवनात मुलांच्या संगोपना कडे दुर्लक्ष केले नाही. मुलांना शाळेतून घरी आणणे असो की त्यांचा अभ्यास करून घेणे असो. मुलांच्या मर्जी प्रमाणे घरी सुद्धा राहतात तेव्हा मात्र कामाचा विचार करत नाहीत. या प्रकारे आई ची भुमिका त्या निभावत आहेत.

डॉक्टर न्रमता यांच्या संस्था.
संचालिका - मेटा सोलूशन
अध्यक्षा --- मेटा फाऊंडेशन
सदस्य --- HR Federation of India
सदस्य -- भारतीय कर्मचारी कामगार महासंघ
वरिल जबाबदार्‍या डाॅ.नम्रता देशमुख -जोसेफ  समर्थ पणे सांबाळत आहेत. शिक्षणात सातत्य हवे, माणसाने अविरत शिकत राहिले पाहिजे या स्वतःच्या तत्वामुळे त्यांच्या स्वतःच्या शिक्षणात पुढिल प्रमाणे वाढ झाली ते पुढिल प्रमाणे. ....
Bachelor in Physics
Master in Psychology and Counselling
M.Phi in English and Education
M.D.in Alternative Medicine
Master in Gerphology
Master in Hand writing
Sujok Master
   डाॅ.नम्रता यांचा समाजाने विविध पुरस्कार देऊन सन्मान केला.
 तेजस्विनी पुरस्कार - आखिल भारतीय मराठी महिला महासंघ .
विशेष महिला पुरस्कार --कल्याण डोंबिवली महानगरपालिका.
महिला पुरस्कार -- खोपोली नगरपालिका
महिला पुरस्कार-- जायन्ड ग्रुप कल्याण

वाचकांनासाठी संदेश :-- आयुष्य खूप सुंदर आहे. सर्व धर्माच्या मुळात मानवता आहे मानवतेने जगा . तुम्ही आनंदाने जगा आणि जगु द्या.

कोळसेवाडीसाठी संदेश :----    आपण  कधीही लहान नसतो , दुसर्‍याच्या दृष्टीकोनातून स्वतःचे जिवन जगू नका. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध ह्या. स्वतःचे आयुष्य जगा. तुमच्यातील वैष्यविक उर्जा ओळखा आणि तिचा वापर करा.

Saturday, 8 October 2016

प्रा.विश्वनाथन अय्यर - अभ्यासासाठी जागा देणारा शिक्षक


                आई शिक्षिका आणि वडील अकाऊंटन या दोघांचा आदर्श माणुन त्यांचा हा मुलगा शिक्षक बनला तो पण अकाऊंट विषयाचा. विद्यार्थ्यांना अकाऊंट विषय सहज सोपा करून शिकवायला लागले ते म्हणजे प्रा. विश्वनाथन अय्यर. बालपणापासून हुषार असणारी ही व्यक्ती अगदी इयत्ता सातवीपासुन घरात आपल्यापेक्षा लहान मुलांचे शिकवणी वर्ग घेवू लागले. पुढे हेच हेरंब कोचिंग क्लासेस  माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या ज्ञानदानाच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु या अडचणीवर आपल्या जिद्दीने मात करत आज प्रा. विश्वनाथ यांचे कार्य अविरतपणे अत्यंत उत्साहात चालूच आहे.
 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांच्या समस्याचे निराकरण सर करत असत त्यात एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना अभ्यास तर करायचे आहे परंतु त्यांना अभ्यासासाठी शांतपणे बसता येईल अशा जागा फार कमी आहेत.
 यावर मात करावी यासाठी तयार झाली कोळशेवाडीतील पहिली अभ्यासिका व्ही.के.मेमोरियबल ट्रस्ट संचलित. या वास्तूचे 1 जानेवारी 2007 रोजी उद्घाटन झाले उद्घाटक होते जेप्ठ साहित्यिक श.ना.नवरे. आणि डाॅ.प्रा.रामप्रकाश नायर सर.
 बालपणाच्या आठवणी सांगत असतांना सरांनी सांगितले चाळीत अभ्यास करत असतांना अनेक वेळा बाजूंच्या घरातून गाण्याचा मोठा मोठा आवाज येत असे. कधी असय्य झाल्याने सर त्यांना जावून विनंती करत असत. परंतु त्याचा काही उपयोग होत नसे. त्याच्यासमोर आवाज कमी केला जात असे, 'पुन्हा ये रे माझ्या मागल्या' पुढे कालांतराने या त्रासाची सवय झाली आणि अभ्यास होत गेला. पण तेव्हाच जाणीव झाली होती की अभ्यासासाठी स्वतंत्र जागा हवी. कालांतराने असेच घडले.
           
                 प्रा. विश्वनाथन अय्यर यांचे शालेय शिक्षण कल्याण पूर्व भागातील माॅडेल इंग्लिश हायस्कूल या शाळेत झाले. इंग्रजी आणि गणित या विषयाची आवड त्यांना पहिल्या पासून होती. प्रभा शिक्षिकेच्या प्रभावी शिकवण्यामुळे मराठी विषयात आवड निर्माण झाली. शालेय जीवनात मुख्याध्यापिका अनुराधा व लतिका शिक्षिका यांचा प्रभाव त्याच्यावर होता. शालेय अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर उल्हासनगर येथील आर.के.तलरेजा महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासुवृत्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गुणावर त्यांनी बारावीत ( H. S. C) महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. परंतु प्रथम क्रमांक मिळाला नाही याची खंत मनात होतीच. यापुढे प्रथम क्रमांक पटकावयाचाच असा मनोनिग्रह केला. महाविद्यालयाच्या पुढच्या तीनही वर्षात प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर झाल्यावर पुढील शिक्षण पुणे विद्यापीठ M.com नंतर C.A. आणि आता P.hd चा अभ्यास.


                    विद्यार्थ्यांची महत्वाची भौतिक गरज म्हणजे अभ्यासासाठी बघण्यासाठीची हक्काची जागा आणि तिथे शांतता असेल तर सोन्याहून पिवळे. अशी शांत व हक्काची जागा कल्याण पूर्व भागात उपलब्ध करून देण्यात आली ती आहे अभ्यासिका व्ही.के.मेमोरियबल. आणि ती जागा उपलब्ध करून देणारे होते विद्यार्थ्यांचे आवडते "विशू सर". या अभ्यासिकेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अभ्यासिकेचे वेळापत्रक. .... चार तासाची एक बॅच या प्रमाणे सकाळी 8 ते 12, दुपार 12.30 ते 4.30, आणि सायंकाळी  5 ते 9 हे आहे. सामान्य विद्यार्थ्यांसाठी तर C.A., PhD व स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी 10 -12 तासाची बॅच. दुसरे प्रमुख वैशिष्ट्य मुलगे व मुली यासाठी स्वतंत्र आसण व्यवस्था.
9 वर्षापासून सातत्यपूर्ण ही अभ्यासिका कोळसेवाडी तील तसेच सभोवतालच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सेवा करीत आहेत.

                  प्रा. विश्वनाथन अय्यर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पण कार्य करीत आहेत हेरंब काॅमर्स क्लासच्या प्रत्येक वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्त दान शिबीर आयोजित करण्यात येत असते . तसेच प्रा.विश्वनाथन हे प्रत्येक महिन्यात एक दिवस आदिवासी पाड्यावर जावून तेथील मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
 स्वामी विवेकानंद यांच्या सार्थसतीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे युवा दौड या कोळशेवाडीतील दौडमध्ये सर सुद्धा धावले आणि सर्वात शेवटी आले. आणि तेथून प्रेरणा घेऊन आज पर्यंत चार हाफ मॅरेथॉन धावले . धावणे व धावण्यासाठी धावपटू तयार करावे यासाठी त्यांनी RUNBURN  नावाने कंपनी स्थापन केली आहे. नवीन धावपटू तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे.


                कुटुंब हे सुशिक्षित होते आई ह्या माॅडेल इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षिका होत्या तर वडील अकाऊंटन होते .कधी कधी ते कार्यालयातील काम घरी आणत असत म्हणूनच विश्वनाथन यांची अकाऊंट या विषयाची नाड जुळली व पुढे आवडीचा विषय बनला . 25 ऑक्टोबर  2002 मध्ये हेरंब काॅमर्स क्लासेसची सुरवात झाली तेव्हा कार्यालयाची जबाबदारी त्याच्या बहीण राधिका राजेश यांनी  सांभाळली  व अतिशय समर्थपणे पार पाडली. आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे असं मत असल्याने ते आपली पत्नी वैजयंती आणि मुलीला वेळ देतात.  समाजातील गरजू लोकांसाठी काम करणे हे त्याच्या आई वडीलांच्या संस्कारातून आले आहे.

 प्रा. विश्वनाथन अय्यर यांचे कौतुक भारताचे माजी राष्ट्रपती  डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांनी केले आहे
Dear Vishwanathan,

     Thank you for your mail.
Dr. Kalam opines that libraries are the temples of learning and they should not bear his name.

You may take appropriate action to find a suitable name.


Best wishes,


वाचकांन साठी संदेश :----
                               मनापासून कार्य करा कार्य कधीच चूकनार नाही,  तूम्हाला जे आवडते ते जगाला नाही आवडणार  परंतु तूम्ही ते कराच. आयुष्यात आपला एक तरी आदर्श असला पाहिजे.


कोळशेवाडी साठी संदेश :----
                            कोळशेवाडी हिऱ्याची खाण आहे,  कोळशेवाडी    हिरे आहेत फक्त त्यांची ओळख करून दिली पाहिजे.....

Saturday, 1 October 2016

मोरया प्रिंटर्स - तरूण उद्योजकांची जोडी. (अमित & योगेश )


मोरया प्रिंटर्स - तरूण उद्योजकांची जोडी.
अमित & योगेश

 
अनेक पालकांना प्रश्न पडत असतो शाळा काॅलेज नंतर आपली मुले घरी का थांबत नाहीत ? घराबाहेर आपली मुले मित्रांसोबत नक्की  कोणते महत्वाचे काम करत असतात ? साहजिकच पालकांना आपल्या पाल्याची काळजी असते. जरा विचार करा आपला पाल्य ज्या मुलांबरोबर आहे त्यांना सोबत घेऊन कोणता तरी व्यवसाय सुरू करतात तेव्हा पुन्हा एक प्रश्न पडतो. आपला  मुलगा एवढा मोठा झाला ? असंच काहीसे घडले असेल जेव्हा मोरया प्रिंटर्सने जाहिरात क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लोकधारा फेज वन मधील बगीच्यात दररोज मित्रमंडळी जमत होते. कधी काही मार्गदर्शन हवे असेल तर त्या मुलांचा एक मोठा मार्गदर्शक मित्र होता वयाने मोठा पंरतु मुलांचा भविष्याचा नेहमी सकारात्मक विचार करणारा दादा (गणेश पानसरे). कधी हे मित्र त्यांच्या बिल्डिंगखाली जमत असत आणि चर्चा करीत. याच चर्चेतून साकारला एक व्यवसाय "जाहिरातीचा". मोरया प्रिंटर्स या नावामागे सर्व धर्म समभावचा इतिहास आहे. तो असा आपण भाषणात बोलतो सर्व धर्म समभाव, पुस्तकात वाचतो, पण कोणी जगतं का ?  हेच या व्यवसायात कसं वापरले गेले ते बघा. जेव्हा व्यवसायाचे नाव काय ठेवायचे या विषयावर चर्चा चालु होती तेव्हा रफिक नावाच्या मुसलमान मित्राने मोरया हे नाव सुचवले.
          अमित डांगे आणि योगेश विचारे हे दोघे बालपणापासून सोबतच, राहायला पण एकाच बिल्डिंगमध्ये, एकाच मजल्यावर अगदी शेजारी शेजारी, दोन घरात एकच भिंत. योगेश हा अमितपेक्षा एका वर्षांनी मोठा तरी वयात आणि विचारात फारसे अंतर नाही. शाळेतून आल्यावर क्रिकेट खेळणे हा रोजचा उपक्रम. योगेश हा सुभेदार वाडा शाळेचा विद्यार्थी तर अमित सेंट मेरी हायस्कूलचा विद्यार्थी. एक मराठी माध्यम तर एक इंग्रजी माध्यम. माध्यम जरी भिन्न असतील तरी मन मात्र एकच.
सगळीकडे दोघांची जोडी दिसायची
बिल्डिंग असो, उद्यान असो की  सोसायटीच्या 26 जानेवारीच्या क्रिडा महोत्सव असो. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघे बारावी पर्यंत के. एम. अग्रवाल ह्या एकाच महाविद्यालय होते. योगेश एक वर्ष पुढे होता त्यापाठोपाठ अमित. योगेशने आपल्या मित्राची काॅलेज क्रिकेट टिममध्ये निवड करून घेतली आणि पुढे एक वर्ष काॅलेज साठी खेळलेे.
         बारावी उत्तीर्ण झाल्यावर योगेश खेळाडू कोट्यातून कामाला लागला. अमित आपले पुढिल शिक्षण घेण्यासाठी डोंबिवलीतील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयात गेला. परंतु नोकरी व काॅलेज यामुळे यांच्या मैत्रीत काही खंड पडला नाही. दररोज सकाळ संध्याकाळ भेटणे होतेच. अमित पदवीधर झाला आणि वडीलांच्या इच्छेप्रमाणे पॅनोसोनिक कंपनी मध्ये नोकरीला लागला. फक्त अकरा महिन्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि योगेश व अमित यांचे एकमत झाले की आपण आता व्यवसाय करूयात.
           जाहिरात क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडले आणि इंटरनेटच्या माध्यमातुन माहिती घेण्यास सुरुवात झाली. तर व्यवसायासाठी लागणार्‍या मशीन कशा व कुठे भेटतील हा शोध सुरू झाला आणि शर्मा सर आणि प्रदिप सर यांच्या जवळ येऊन थांबला. पहिल्याच मिटिंगमध्ये सर म्हणाले, "तूम तो बच्चे हो कैसे बिजनेस करोगे ?" परंतु भेटीतील सातत्य व जिद्दीपणा यामुळे सर तयार झाले. मशीन विकण्यास व त्या बरोबर ही मशीन कशी चालवावी हे प्रशिक्षण देण्यासाठी. आता अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आता व्यवसायासाठी भांडवल कसे उभे करायचे. मिञामध्ये चर्चा झाली, गणेशदादांनी सुचवले व त्याप्रमाणे आपापल्या घरी सांगावे व भांडवल जमा करावे असे ठरले आणि ही एक मोठी कसोटी होती. यात पण अमित आणि योगेश यशस्वी झाले त्यांनी भांडवल उभे केले. दिनांक 18 सप्टेंबर 2012 रोजी मोरया प्रिंटर्सचे काम सुरू झाले.
 पहिलेच काम हे "Bombay Film Festival"चे यात त्यांना 9 बॅनर स्टँन्डी आणि 500 प्रवेशिका बनवल्या होत्या. एका मशीन वर सुरू झालेले काम आज चार मशीन, सहा कामगार, एक टेम्पो एवढे विस्तारले आहे. या विस्तारासाठी दिवस-रात्र परिश्रम होते. व्यवसाय म्हटल्यावर अडचणी येतात परंतू प्रत्येक अडचणींवर मात करून मोठ्या जिद्दीने व्यवसाय चालू आहे. आणि दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आतापर्यंत जाहिरात क्षेत्रातील प्रत्येक काम मोरया प्रिंटर्समध्ये केले जाते. आता तर D.T.P. असो, प्रिंट मारणे असो की जाहिरातीचे तयार झालेले फलक लावणे असो या प्रत्येक कामात योगेश व अमित निपून झाले आहेत.
       वयाच्या 21 व 22 व्या वर्षी व्यवसायाचा प्रारंभ करून त्यात प्रगती करून दाखवणारे दोन्हीही तरूण उद्योजक कल्याण पूर्व मधील आहेत. मराठी तरूणांना ही व्यवसाय समर्थपणे करता येतो याचे उदाहरण या मोरया प्रिंटर्सने घालून दिले. एकमेकांवरील विश्वास, बुद्धीमत्ता, जिद्द, कल्पनाशक्ती, मेहनत या गुणांचा पुरेपूर वापर करून हे तरूण उद्योजक आज प्रगती असुन नवतरूणासाठी आदर्श आहेत.

वाचकांसाठी संदेश :-- आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय आपण काम करू शकत नाही, आई वडिलांचे सदैव एेकले पाहिजे. आपल्याला जे क्षेत्र आवडेल त्याच्यातच कार्य करावे त्यासाठी आवडीच्या क्षेत्राचे ज्ञान घ्यावे. मनापासून काम केल्यावर फायदा होतोच, जर आपले नुकसान होत असेल तर काम करणे थांबवू नका प्रयत्न करा ते नुकसान नफ्यामध्ये परीवर्तीत होईलच.

 कोळसेवाडीसाठी संदेश :--- कोळसेवाडीत कोणताही उद्योग यशस्वी होऊ शकतो, परंतु तो मनापासून कष्टाने केला पाहिजे.