Sunday, 26 January 2020

सौ सुरेखा अशोक गावंडे संसाराची जबाबदारीतून निर्माण झाल्या कविता आणि जन्म झाला एका कवयित्री चा.

सौ सुरेखा अशोक गावंडे

 संसाराची जबाबदारीतून निर्माण झाल्या कविता आणि जन्म झाला एका कवयित्री चा. नोकरदार गृहिणी ते कवयित्री  असा प्रवास सिद्ध करत आहेत कवयित्री ,लेखिका, गीतकार अभिनेत्री ,गिर्यारोहक, समाजसेविका या सुरेखा गावंडे कला विश्वातील ही नवदुर्गा आपल्या कल्याण पूर्व मध्येच गेली 36 वर्षांपासून वास्तव्यास आहे.

घरातील काम नोकरीसाठी चा प्रवास त्यातून वेळ काढत त्या आपल्या कवितेविषयी प्रेम जपत आहे. कल्याण ते छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस या लोकल ट्रेन मधील प्रवासातच त्यांना निसर्ग कविता सुचत गेल्या तर मुलीच्या जन्मानंतर त्यांना बाल कविता सुचत गेल्या आणि त्यांनी त्या आपल्या कवितासंग्रहात उतरवल्या. 

कवियत्री म्हणून मिळालेला यशात त्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींपासून ते मार्गदर्शक व्यक्ती  पर्यंत सर्वांना समान भागीदार मानतात हे विशेष.

गिरगाव दिव्याची चाळ येथे बालपण गेले काळबादेवी शाळा आणि शिरोडकर हायस्कूल चिकित्सक शाळा येथे शालेय शिक्षणाचे त्यांनी धडे गिरवले. श्री अशोक गावंडे यांच्याबरोबर विवाह झाला आणि ही मुंबई ची पोर कल्याण ची सून झाली. संसार थाटला मुलं मोठी झाली त्यानंतर त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
37 वर्ष महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबई इथे नोकरी करून त्यांनी आपल्या कविता फुलवल्या कार्यालयीन कामकाज सांभाळता सांभाळता कवितालेखन म्हणजे तारेवरची कसरत होती. ऑफिसच्या संचार कार्यक्रमात कविता सादर करता करता आंतरराष्ट्रीय कवी संमेलनापर्यंत त्यांनी प्रवास केला. कवयित्री सुरेखा गावंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या सुगम भारती इयत्ता आठवीच्या पुस्तकात "कोळ्याची पोर" ही  कविता अभ्यासक्रमासाठी सामाविष्ठ करण्यात आली. बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ पुणे त्यांनी ती निवडली..
"पहिला पाऊस पहिलं प्रेम" या मराठी गाण्यांचा अल्बम मध्ये गीत लिहिण्यापासून अभिनया पर्यंत त्यांनी काम केले. "संजल ची दंगल", "सवंगडी" हे त्यांचे बाल काव्यसंग्रह "सांजवेळ", "साक्षी" हे त्यांचे कवितासंग्रह तर "सह्याद्रीची लेख हिमालयाच्या कुशीत" हे प्रवासवर्णन यांच्या निर्मिती उल्लेखनीय आहेतच.
सवंगडी या बालकाव्य संग्रहातील गीते आकाशवाणीच्या अस्मिता आणि गंमत जंमत चॅनेलवर प्रसारित झाली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यातील काही ठळक पुरस्कार ज्याची आपण नोंद घ्यावी जसे नवी दिल्ली येथे "राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार" शिर्डी येथे "जीवनगौरव पुरस्कार" मुंबई येथे नेल्सन मंडेला राष्ट्रीय पुरस्कार" पुणे येथे "महाराष्ट्र साहित्य भूषण शिवरत्न पुरस्कार" मुंबई येथे "सुजन साहित्य पुरस्कार" कल्याण येथे "सलाम संविधान पुरस्कार" पुणे येथे "साहित्यरत्न पुरस्कार" इंदापूर येथे" राष्ट्र शाहीर अमर शेख पुरस्कार" अशा अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रात तसेच देशाच्या राजधानीत या कवियत्री चा तिच्या कवितांचा सन्मान झाला
नाट्यक्षेत्रात आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आकाशवाणी,दूरदर्शनवर कथावाचन,काव्यवाचन तसेच अनेक नियतकालिक,दिवाळीअंक,वर्तमानपत्र मधून लेख प्रकाशित, मराठी चित्रपट गीतलेखन अशा या हुरहुन्नरी कवियत्री च्या कामाचा आम्ही घेतलेला हा आढावा.

वाचकांसाठी संदेश निसर्गाचे तसेच समाजाचे निरीक्षण करा प्रेमा पलीकडे अनेक विषय आहेत ते वाचा त्याच्यावरती लिखाण करा.

Saturday, 24 March 2018

संदिप वसंत पवार ...... आपले पर्यटन सोबती




संदिप  वसंत पवार ...... आपले पर्यटन सोबती 


         अनेक लोकांचे स्वप्न असतात की संपूर्ण जगात भटकंती करावी . हे स्वप्न सत्यात उतरवणारे संदिप  गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने आपले काम ''हॅलो प्रवासी'' या संस्थेमार्फत निष्ठेने करीत आहेत. 

        कल्याण पूर्वेतील शिशुविहार या शाळेत संदिपचे  प्राथमिक  शिक्षण झाले. ते लहानपणापासूनच शांत स्वभावाचे व अभ्यासात चुणचुणीत होते. पुढे त्यांनी कल्याण पश्चिममधील 'न्यू हायस्कूल' या शाळेमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या आई पोस्टात कामाला होत्या. जर कधी त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला तर संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी संदिपवर असायची . तेव्हा ते जेवणात त्यांच्या आवडीची चपाती आणि बटाटा भाजी बनवायचे. 

       लहान भाऊ विलास आणि लाडकी बहीण शिल्पा यांच्या आनंदी सहवासात संदिपचे बालपण संपले. त्यांच्या आई लिलावती यांनी नोकरी करून  मुलांना छान सांभाळले. नोकरी करत असल्या तरी मुलांवर चांगले संस्कार करण्यात त्या कधीच मागे पडल्या नाहीत. त्याचा प्रत्यय संदिपच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यावर येतो. संदिपचे अतिशय सकारात्मक असे व्यक्तिमत्व आहे. माध्यमिक शालांत शिक्षणासाठी पुढे ते उल्हासनगरमधील आर. के. तलरेजा  महाविद्यालयातून  बी. कॉम. पदवीधर म्हणून बाहेर पडले आणि  पुढे त्यांनी अर्थाजनासाठी काम सुरु केले. 

         मुंबईला चार्टर्स अकाउंट कंपनीत त्यांनी पहिली नोकरी केली. नंतर वर्षभरामध्ये अकाउंटचा अनुभव घेऊन अकाउंटन्ट म्हणून काम सुरु ठेवले. पुढे तीन वर्ष 'ओमकार डेव्हलोपर्स, बदलापूर' येथे कंपनीचा हिशोब जबाबदारीने सांभाळला. त्यानंतरचा प्रवास परत मुंबईच्या दिशेने सुरु केला आणि आदित्य बिर्ला समूहाच्या दिग्विजय इंटरनॅशनल या कंपनीत काम सुरु झाले. त्यांनी सिरियन एरलाईन्स या कंपनीत ६ वर्ष मुख्य अकाउंटन्ट म्हणून काम केले. पुढे थॉमस कुक या कंपनीत ३ वर्षे 'वरिष्ठ लेखापाल'  म्हणून काम करीत असतांना त्यांना परदेशात स्थायिक व्हायची संधी आली. परंतु त्यांनी ती नाकारली व सचिन ट्रॅव्हल्समध्ये पुढील सेवेसाठी ते रुजू झाले. 

          सुनील वागळे यांच्यासोबत २०१३ मध्ये संदिपने कल्याण येथे ''हॅलो प्रवासी'' या नावाने पर्यटन क्षेत्रात कार्य सुरु केले. आज ''हॅलो प्रवासी''  यांच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि पुणे येथे शाखा सुरु आहेत. जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज ''हॅलो प्रवासी''  २०१३ पासून कार्यरत आहेत. 

         १३ जुलै २०१३ मध्ये सुरु झालेले  ''हॅलो प्रवासी'' यांचे काम पहिली सहल आयोजित करून सर्व पर्यटकांना २४ ऑक्टोबरला राजस्थान, केरळ, काश्मीरला जवळ जवळ ३०० कुटुंबीयांना घेऊन गेले. त्यानंतर भारत भ्रमंतीचा यशस्वी टप्पा दोन वर्षात पूर्ण केल्यावर ऑक्टोबर २०१५  मध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशी पहिली आंतरराष्ट्रीय टूर यशस्वी झाली. 

           आज ''हॅलो प्रवासी'' आपला पर्यटनसोबती बनून पर्यटकांना सेवा देत आहेत. त्यांचे रहस्य म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असे ग्राहकांना व पर्यटकांना १०० टक्के समाधान मिळेल असे काम करणे. कोणतीही सहल जाण्याअगोदर संदिप हे त्या ठिकाणाचा अभ्यास करतात. त्यानंतर सहलीचा कार्यक्रम तयार करतात. अशाप्रकारे हसतमुख व्यक्तिमत्व व जबाबदार व्यक्ती हे  गुण संदिपमध्ये दिसतात. संदिपला त्यांच्या व्यवसायात सुनील वागळे यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची जोड लाभली आणि संदिपने त्यांच्या साथीने २०१५ मध्ये डोंबिवली, २०१६ मध्ये ठाणे व २०१७ मध्ये पुणे येथे  ''हॅलो प्रवासी'' या शाखांचा विकास केला. अशा पद्धतीने दरवर्षी एक एक शाखा स्थापन करण्याचा ''हॅलो प्रवासी'' यांचा मानस आहे. 

           अशाप्रकारे  संपूर्ण जग प्रवास करण्यासाठी खात्रीशीरपणे पर्टनसोबती म्हणजे ''हॅलो प्रवासी''





     






Monday, 12 June 2017

कल्याण पूर्वेत रॉटरी क्लबची शाखा सुरु करणारे संस्थापक श्री. संदीप कृष्णा चौधरी.....


कल्याण पूर्वेत रॉटरी क्लबची शाखा सुरु करणारे संस्थापक श्री. संदीप कृष्णा चौधरी.....

       
कल्याण पूर्वेत रोटरी क्लबची शाखा सुरु करणारे संस्थापक श्री. संदीप कृष्णा चौधरी.....
        दूरदृष्टी, कल्पक, मेहनत या त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या व्यवसायात प्रगती करत असून नवनवीन व्यक्तींना संधी निर्माण करून देणारे, सतत नेतृत्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संदीप कृष्णा चौधरी. मित्र योगेश कलापुरे यांच्या निमंत्रणानंतर २०१२ मध्ये रोटरी क्लब ऑफ रीव्हर साईडचे सदस्य झाले. अवघ्या दोन वर्षात २०१४ मध्ये कल्याण पूर्वेच्या सामाजिक विकासासाठी कल्याण पूर्वेत रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची निर्मिती केली. आपल्या क्लबच्या कार्यामुळे प्रथम वर्षीच डिस्ट्रिक्ट सी १४० कडून गोल्ड क्लब म्हणून सन्मानित करण्यात आले.
          इंग्रजी माध्यमातून बालपणीचे शिक्षण झाले. गणित व विज्ञान हे विषय सुरुवातीपासूनच आवडीचे त्यात इयत्ता ७ वी ला असताना त्यांच्या शाळेच्या वतीने नेहेरु सायन्स सेंटरमध्ये नेण्यात आलेल्या विज्ञान सहलीत निवडक मुलांमध्ये संदीप यांची निवड झाली तो दिवस आजही संदीप यांना स्पष्ट पणे आठवतो. इयत्ता १० वी मध्ये ८५ टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी बिर्ला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयातील शिक्षणाबरोबर ते अर्थार्जन करू लागले. त्यांच्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांच्या ते शिकवण्या घेऊ लागले. तसेच ११ वी नंतरच्या येणाऱ्या उन्हाळी सुट्यांमध्ये डोंबिवली येथील एम.आई.डी.सी. तील सुनिल डाईंग फॅक्टरीमध्ये कामाला जात असत. कल्याण ते डोंबिवली हा प्रवास ते सायकल वर करीत असत.  काम करीत असताना टेल्को ह्या कंपनीत त्यांची मुलाखात झाली परंतु त्या वेळेस त्यांचे वजन फक्त ३३ किलो असल्याने ते शारीरिक क्षमता चाचणीमध्ये नापास झाले ह्या गोष्टीची खंत न बाळगता संदीप ह्यांनीं शरीर सुदृढ करण्याचा दृढ निश्चय केला आणि रिक्रीएशन व्यायाम शाळेत प्रवेश घेतला. सातत्य आणि शिस्त तसेच मेहेनत यामुळे त्यांनी पुढील वर्षात शरीर सौष्ठ (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेत रामबागश्री आणि बिर्लाश्री हा पुरस्कार प्राप्त केला. तसेच वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात ठाणे जिल्ह्यात तृतिय क्रमांक संपादन केले. नाकाराने खचून न जाता त्याच क्षेत्रात यश संपादन केले त्यावेळी त्यांचे वय अवघे १८ वर्ष होते.
          व्यावसायिकता किशोर वयापासूनच होती. लहान इयत्तेत असणाऱ्या मुलांच्या शिकवण्या घेणे तसेच सण-उत्सव जवळ आले कि त्या सणाला लागणाऱ्या गोष्टींचा व्यवसाय करणे; उदाहरणार्थ दिवाळीत फटाक्यांचा व्यवसाय करणे, यामुळे कुठेही त्यांच्या अभ्यासावरती परिणाम झाला नाही. १२ वीत संदीप प्रथम वर्गाने पास झाले. पुढे यक्ष प्रश्न होता पास तर झालो परंतु इंजिनीरिंग साठी लागणारे फी चे पैसे भरणे शक्य नव्हते, परंतु इच्छा असेल तर मार्ग निघालाच पाहिजे. नवसील कंपनीमध्ये इंजिनीरिंग चे प्रशिक्षणार्थी म्हणून संदीप चौधरी यांची निवड झाली कंपनी तर्फे पी. व्ही. एम. एस. या महाविद्यालयात इंजिनीरिंगचे शिक्षण घेण्यास पाठवत असत. अशा प्रकारे संदीप चौधरी इंजिनिअर झाले. पुढे याच कंपनीमध्ये १९८८ ते १९९१ पर्यंत संदीप चौधरी यांनी इंजिनीअर म्हणून काम केले. पुढे ए. के. इंजिनीअरिंग कंपनीत नोकरी केली. याच दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून आपले काम वाढवले. थेऊर येथील यशवंत चव्हाण साखर कारखान्यातील डिस्टिलरी प्लांटच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी कंपनीतर्फे संदीप यांच्यावर सोपवण्यात आली.  महाराष्ट्र बरोबर गुजरात, गोवा, पंजाब, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये कामानिमित्त भटकंती होत होती. बायर्स केमिकल या कंपनींत १० वर्ष संदीप यांनी नोकरी केली आणि याच दरम्यान संदीप यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात पाण्याचे पंप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. शनिवार किंवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ ही काम होत होती. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथील हौसिंग सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची काम सुरु झाली. यातूनच वैदेही इंजिनिअरिंग आणि पी. के. इंजिनीअरिंग अशा दोन कंपन्याची सुरुवात झाली साल होते १९९३ श्री एन्टरप्राइसेस हा सुद्धा याचाच भाग होता.
         पंकज चौधरी हा लहान भाऊ व्यायसायात मदत करू लागला. वर्षभरातच ४५० हाऊसिंग सोसायटीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर इंटेरिअर डिसाईनिंगची कामे घेऊ लागले. पहिले काम होते ते श्री भोसले यांच्या घरातले. हिराबागेत पहिले घर पूर्ण केले व पुढे १०,७२३ घरांचे इंटेरिअर पूर्ण करण्यात आले. २००७ मध्ये लोकगृपचे २२ प्रोजेक्टस मिळाले. २०११ मध्ये नेपच्युन इन्फोटेक अंधेरी या कंपनीचे काम केले. २०११ मध्ये फोर्टिज हॉस्पिटलचे काम, २०१२ मध्ये एल. आई. सी. कार्यालयाचे काम, पतपेढी, मल्टीस्पेसीआलिस्ट हॉस्पिटल, पोलीस स्टेशन्स, राजकीय नेत्यांची कार्यालये, शासकीय अधिकाऱ्यांची घरे असे विविध प्रकारचे काम नवीन कंपनी गृह रचना इंटेरिअर अँड एक्सटेरिअर प्रस्थापित करून तेथून पार पाडण्यात आले.
         २०१३ मध्ये बिसिनेस एक्सिलेन्स ह्या अवार्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श प्रतिष्ठाण ठाणे यांच्या वतीने उद्योगरत्न हा पुरस्कार देण्यात आला.
वाचकांसाठी संदेश: इतरांना सतत मदत करत राहा. त्याची फळे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात मिळतच राहतील.

Saturday, 31 December 2016

शिवशंकर दुर्गाप्रसाद शाहू(शिवा) तरूण उद्योजक


शिवशंकर दुर्गाप्रसाद शाहू(शिवा) तरूण उद्योजक

   
    जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या आधारावर महेंद्रा मोटर्स, टाटा मोटर्स, टॅब कॅप, ऑटो रिक्स या सारख्या नामांकित कंपनीमध्ये आपल्या गुणवत्तेच्या आधारावर अमान्य प्रगती करणारे ते "शिवशंकर" ऊर्फ "शिवा" हे निर्णय घेतात की आता व्यवसाय करायचा. आणि काही वर्षांतच ते व्यवसायात प्रगती करून तरूणांसाठी आदर्श उभा करतात ते म्हणजे "दुर्गा ऑटो पार्ट आणि सर्विस सेंटर". कल्याण पूर्वेमधील काटेमानिवली नाक्यापासून हाकेच्या अंतरावर शिवा यांचे सर्विस सेंटर आहे.
                  आपण एखाद्या कंपनीसाठी दिवस-रात्र मेहनत करतो आणि त्याचा मोबदलाही मोठा मिळतो. परंतु आपण हीच मेहनत आपल्याच उद्योगात केली तर मोबदला पण मिळतो आणि याचबरोबर आत्मिक समाधान. हेच शिवशंकर यांनी आपल्या कामातुन साध्य केले.
           महेंद्रा मोटर्सचे फस्ट चॉईस या विभागासाठी  मुंबई येथे काम करण्यासाठी दिल्लीतुन नियुक्त्ती करण्यात आली. आपल्या गुणवत्तेच्या आधारावर शिवशंकर यांच्याकडून काही दिवसातच कंपनीला अपेक्षित कामाची पूर्तता व्हायला लागली. आणि काही महीन्यातच कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होण्यास सुरवात झाली. याचे संपूर्ण क्षेय शिवशंकर व त्यांच्या सहकार्यांना जात होते. यांनी अल्पावधीत कंपनीला नफा मिळवून दिला. याच कामाची अधिकारी वर्गाकडून दखल घेण्यात आली. आणि हीच नोकरी "शिवशंकर" यांची शेवटची नोकरी होती त्यानंतर त्यांनी उद्योगाचा निर्णय घेतला. तसं नोकरीची सुरुवात ही ऑटो रिस्क या कंपनीपासून झाली होती. ही वाहनविमातील नामांकित कंपनी आहे. यात शिवशंकर यांना ज्या गाडीचा अपघात झाला आहे त्या ठिकाणी जावून गाड्याची पाहणी करणे आणि त्या गाडीचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याचा तपास करून एक अहवाल तयार करून कंपनीला सादर करणे तसेच या कामासाठी त्यांना मुंबई ते गोवा, मुंबई ते सुरत, मुंबई ते हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर असा महामार्गावर सतत प्रवास करणे. हेच काम शिवशंकर अती आनंदाने करीत असत, या कामाने त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तर दररोज काहीतरी नवनवीन शिकणे आणि आपल्या ज्ञानात भर पाडणे ही जणू त्यांची एक सवयच झाली होती.

        टॅब कॅब या कंपनीसाठी काम करतांना मालाड येथे शिवशंकर हे डेपोचेईन्चार्ज होते.त्यांना सुमारे चार हजाराहून अधिक गाड्यांची माहिती  ठेवावी लागत होती. चालक आला कि त्याला गाडी देणे, आणि तो जेव्हा गाडी डेपोत घेवून येईल तेव्हा गाडी परीक्षण करून गाडी डेपोत लावणे हे जरी सहज वाटणारे काम असले तरी यात त्यांना २५ ते ३० मॅकेनिक सांभाळायला लागत होते. एक तर वय कमी त्यात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणा-या माणसांकडून काम करून घेत असताना शिवशंकर यांचा कस लागत असे. डेपोत किती गाड्या आहेत, बाहेर रस्त्यावर किती गाड्या आहेत त्याच्या सर्व नोंदी त्यांना ठेवाव्या लागत होत्या. या कामात ते इतके व्यस्त राहत असत कि ते तीन-तीन दिवस घरी पण येत नसत. कामावरच त्यांचे घर तयार झाले होते. तेथील कामगारांशी त्यांचे घरचे संबंध तयार झाले होते. त्याचप्रमाणे प्रत्येकाला सांभाळून घेवून त्याच्याकडून काम करून घेण्यात शिवशकंर या ठिकाणीच तयार झाले होते.

        २४ डिसेम्बर २०१३ मध्ये दुर्गा स्पेअर पार्टस् अँड ऑटो गॅरेज या नावाने शिवशंकर यांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली. सुरूवातीच्या काळात त्यांना घरच्या सर्व व्यक्तींचा विरोध होत होता. अनेक प्रश्न विचारले जायचे कि तू चांगली नोकरी सोडून का असं करतोस? वडिलांनी तर असे सांगितले होते कि तुझा उद्योग स्वत:च सांभाळायचा घरातून तुला कुणीच मदत करणार नाही. पण महिन्याभरातच उद्योग आणि प्रगती यातुन शिवाची मेहनत दिसायला लागली. तसा घरातल्यांचा राग व विरोध मावळला आणि सर्व त्याला मदत करायला लागले. शिवा आता गॅरेजवाला झाला होता. आपण कधी अधिकारी होतो याचा त्यांना जणू विसरच पडला होता. नवीन उद्योग बघण्यासाठी जुने सहकारी येत असत तेव्हा ते बोलत सर तुम्ही कशाला हात काळे करतात, आम्ही करतो ना. ह्याला शिवशंकर नेहमी हसून नकार देत असत. अशा प्रकारे घरच्यांच्या सहकार्याने व आपल्या हिमतीवर शिवाने आपला स्वत:चा धंदा उभा केला आणि तो आता प्रगती पथावर नेला.
      व्यवसाय हा उत्तम पद्धतीने चालू झाला. साधारणत: दिवसाला २२ ते २५ गाड्या दुरुस्त होतात.  व्यवसायामध्ये दोन्ही भाऊ निलांचल व शिलांचल मदत करीत आहेत . अवघ्या तीन वर्षात शिवशंकर यांनी व्यवसायात चांगली प्रगती केली. आज शिवाचे गॅरेज म्हणून ओळखले जात आहे. हे संपूर्ण शक्य झाले ते एका धाडसी निर्णयानेच. तो म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणे.
       शिवशंकर यांचे बालपण हे कोळसेवाडीतील चाळीत गेले. लहानपणापासूनच गाड्यांबद्दल त्यांना फार आकर्षण होते. अगदी आठवीपासूनच घराजवळ असलेल्या बंड्या दादाच्या  गॅरेजवर जावून बसत असत.  तास तास भर काम पाहत असत. दहावीपर्यंतचे शिक्षण हे मॉडेल इंग्लिश हायस्कूल येथे झाले. या सर्व गोष्टीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दहावीत नापास व्हावे लागले. परुंतु जिद्दी शिवा दहावीला पुन्हा सर्व विषय घेवून बसला आणि चांगल्या मार्कानेही पास झाला. मग शिक्षणसाठी कधीच मागे नाही राहीले. मुंबईत किंग जॉर्ज या अभियांत्रिकी  महाविद्यालयात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. शिवशंकर यांचा ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचा अभ्यास सुरु झाला, लगेच डीझेल मॅकेनिकलसाठी आय. टी. आय. ला प्रवेश घेतला. पुढे तीन वर्ष श्रमिक विकासच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचे कार्य सुद्धा केले. पुढे याच शिक्षणाच्या आधारावर नोकरी लागली.
        कुटुंब तसं खूप प्रेमळ यात आई, बाबा आणि दोन भाऊ. एक लहान आणि एक मोठा. बाबा रेल्वेत माटुंगा वर्कशॉप मध्ये कार्यरत. तर आई  गृहिणी अशा साध्या सरळ घरात एक उद्योजक तयार झाला.
       शिवशंकर असं म्हणतात कि यश मिळवण्यासाठी जीवनात संघर्ष करण्याची तयारी पाहिजे.

Sunday, 20 November 2016

डॉक्टर भुषण सुभाष पाटील-मनाचे.... डाॅक्टर


डॉक्टर भुषण सुभाष पाटील
     मनाचे.... डाॅक्टर.


          "मला मोठे होऊन डाॅक्टर व्हायचे आहे" असे लहानपणापासून बोलणारा मुलगा भुषण "डाॅक्टर" होतो. सर्वसाधारणपणे सर्वांच्या घरात लहान मुलांना प्रश्न विचारला जातो कि, 'तु मोठा झाल्यावर काय बनणार ?' आणि उत्तर दिले जाते, 'मी डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, वकील बनणार परंतु यातील किती मुले मोठे झाल्यावर आपले स्वप्न पूर्ण करतात हा संशोधनाचा विषय आहे. गणेश विद्यामंदिर शाळेत असलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शाळेतील पहिल्या दिवशी पहिल्या तासाला प्रश्न विचारला गेला होता की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचे आहे ? आणि एका विद्यार्थ्यांने क्षणात उत्तर दिले "डाॅक्टर". असे उत्तर देणारे होते ते आजचे मनाचे डाॅक्टर "भुषण पाटील".

            अभ्यासुवृत्ती, हसतमुख व मनमिळावु स्वभाव, हुशार व्यक्तिमत्त्व यामुळे डाॅक्टर भुषण पाटील हे शाळेत सर्वात लाडके होते. त्यांनी शाळेत विद्यार्थी प्रमुख म्हणून कित्येक वर्षे काम केले. त्यांना गणित व विज्ञान या विषयांची आवड. त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारावर दहावीच्या परीक्षेत 90 % गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाऊन यश संपादन केले. या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती तर होतीच पण त्याबरोबर होती ती आई-वडीलांची विशेष मेहनत. दहावीच्या परिक्षेनंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणे, खेळणे, मस्ती करणे असे उपक्रम चालतात. परंतु डाॅक्टर भुषण यांनी मात्र अकरावीचे विज्ञान, गणित ही पुस्तके घेऊन त्यातील पारिभाषिक संज्ञा कंठस्त केल्या. नवीन शब्द, संकल्पना समजावून घेतल्या. असा हा विद्यार्थी मामाच्या घरी गेल्यावर सुद्धा शुद्धलेखन, पाठांतर करणे असे उपक्रम चालु ठेवीत असत. या उपक्रमात मामा जातीने लक्ष देत असत. मामा "कारभारी थोरात" हे शिस्तीचे कडक पण प्रेमळ होते. ते स्वतः सर्व भावंडांना घेऊन संध्याकाळी अभ्यासाला बसत असत. त्यात दररोज वृत्तपत्र वाचणे, शुद्धलेखन, पाठांतर करणे असा घरातील नित्यक्रम होता.
           उल्हासनगर येथील C.H.M. महाविद्यालयात डाॅक्टर भुषण पाटील यांनी प्रवेश घेतला. सुट्टीत झालेल्या अभ्यासामुळे  महाविद्यालयातील अभ्यासाला गती मिळाली. प्रा.भाटिया सरांच्या मार्गदर्शनाखाली 2003 च्या H.S.C च्या परीक्षेत 88% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. MH-CET मध्ये त्यांनी ठाण्यात प्रथम क्रमांक पटकावला. आणि जे.जे. ग्रेड मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रवेश निश्चित केला. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी होता. तो इतका की त्यांच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
         2008 मध्ये M.B.B.S. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2008 ते 2009  इंटरशिपमध्ये असतांना अभ्यास करून डाॅक्टर भुषण पाटील हे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट बघायला जाणे, मुंबईच्या चौपाटीवर फिरणे, मरिन लाईनला चालणे, G.M.C. जिमखाना येथे खेळणे अशा मजेदार आठवणी अजूनही डाॅक्टर भुषण पाटील यांच्या मनात ताज्या आहेत. इंटरशिपमध्ये सर्व विभागात डाॅक्टर काम करत असतात. मानसिक विभागात काम करतेवेळी डाॅक्टरांना या विभागाची आवड निर्माण झाली. M.D साठी मेडिसिन किंवा न्युरोसायकियाट्रिक असे दोन पर्याय. त्यातील न्युरोसायकियाट्रिक हा पर्याय डाॅक्टर भुषण पाटील यांनी निवडला. या निर्णयामुळे  कुटुंबातील सर्वच सदस्य आणि मित्रपरिवार आश्चर्यचकित झाले. कुणालाच विश्वास बसत नव्हता की डाॅक्टर असा निर्णय घेतील. शेवटी M.D चा अभ्यास नायर हॉस्पिटल मुंबई येथे सुरू झाला.
           
           डाॅक्टर भुषण पाटील व त्यांचे सहकारी डाॅक्टर एक मनोरुग्ण तपासण्यासाठी गेले तेव्हा तो चिडला आणि त्याने डाॅक्टरांना मारायला सुरुवात केली. त्याला शांत करण्यासाठी आघाडीवर डाॅक्टर भुषण पाटील ज्यांनी कधी कुणाचाच मार खाल्ला नव्हता मग घरी आई-वडील असो की शाळेत शिक्षक असो परंतु येथे रूग्णाचा मार खाल्ला. या प्रसंगानंतर सिनीयर डाॅक्टरांनी, "Welcome to
Neuropsychiatric unit" असे म्हटले. डाॅक्टर भुषण पाटील यांना त्यांचे मित्र Last minute Revision असे संबोधीत असत. म्हणजे त्यांनी काढलेल्या प्रश्नांपैकी 70% प्रश्न परिक्षेत येत असत. त्यांचे M.D in Neropsychiatry  पुर्ण झाले आणि मुंबईतील राजावाडी रूग्णालयात रूग्णाची सेवा करण्यासाठी ते रूजू झाले. राजावाडी  या ठिकाणी रूग्णाची सेवा करीत असतांना एक विचार नेहमी त्यांच्या मनात एक विचार येत होता आपण लहानाचे मोठे ज्या विभागात झालो त्या विभागात आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे . मग नजिकच्या काळात अशी संधी मेट्रो हॉस्पिटल मध्ये डाॅक्टर भुजबळांनी दिली. 4 फेब्रुवारी 2014 रोजी मेट्रो हॉस्पिटल कल्याण पूर्व येथे आपले काम सुरू केले.
         
                 10 जानेवारी 2016 रोजी कल्याण पूर्व मधिल प्रथम मनोरुग्णालय  Right to live life with dignity. Well-being in each individual and enable them या vision ने मनस्पर्श न्युरोसायकियाट्रिक सेंट्रर व नर्सिंग होम सुरू झाले.यात डाॅक्टर भुषण पाटील यांना सहकार्य झाले ते डाॅक्टर  विजय चिंचोळे यांचे . कल्याण पूर्व येथे प्रथमच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय? याची ओळख करून दिली. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थीन साठी व्याख्याने, जनजागृती रॅली, मन-कि-बात हा कार्यक्रम ,कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती अभियान. या सर्व कार्यक्रमात डाॅक्टर भुषण पाटील यांची कल्पकता व ज्ञानाची सागड पाहावयास मिळाली.
डाॅक्टर भुषण पाटील व डाॅक्टर विजय चिंचोळे हे आपल्या संपूर्ण मानसोपचारतज्ज्ञ यांच्या साह्याने कल्याण पूर्व मध्ये सेवा देणारी एकमेव संस्था आहे.
         
     शिस्त, प्रोत्साहन हे गुण आईकडून डाॅक्टर भुषण यांच्यात आले तर पाककृती चे कौशल्य आई कडूनच . समाजात काम करणे , हळवा स्वभाव, मेहनत, हे गुण बाबांकडून आले. बाबा सदैव ठाम पणे डाॅक्टर भुषण यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. महेश व राकेश या दोन्ही भावंडांची साथ , आणि आनंद, प्रेरणा मिळत आहे .कुटुंबातील आनंददायी वातावरण हे डाॅक्टर भुषण पाटील यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.
 
वाचकांसाठी संदेश :---समाजाने मानसिक रूग्णासाठी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. मानसिक रोग गरिब श्रीमंत असा भेद करीत नाही तर, मानवी हक्का मध्ये मानसिक रुग्णांच्या मानवी हक्कांचा विचार झाला पाहिजे. समाजामध्ये मानसिक रूग्णांना जगण्याचा अधिकार द्या.

Friday, 11 November 2016

निलेश कानिफनाथ अभंग - तरूण उद्योजक.


निलेश कानिफनाथ अभंग
तरूण उद्योजक.

कल्याण पुर्वेतील अनेकांना ओळखीचा असलेला चेहरा म्हणजे निलेश अभंग, सतत हसतमुख चेहरा आणि डोळे अत्यंत बोलके आणि महत्वाकांक्षी, शारीरभाषा (Body Language) निगर्वी. इतरांशी आस्थेने संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या काळजात निलेश कधी घर करतो, ते कळतही नाही.  

आज निलेशने व्यवसायांत उत्तम जम बसवलेला आहे. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर या व्यवसायिक संस्थेचा विकास वेगाने होत आहे. प्रामाणिकपणा आणि आत्यंतिक व्यवहारकुशलतेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यात निलेशला यश मिळाले. शासनाच्या ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टसाठी काम करताना ऑनलाईन कागदपत्रे बनवून देण्यात निलेश यांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर अग्रेसर असते. सत्यमची सहा जणांची प्रोफेश्नल टीम नागरिकांच्या सेवेत सतत कार्यरत असते.   रोज ३००-३५० नागरिक शासकीय कागदपत्रे बनवण्यासाठी सेंटरमध्ये येतात. त्यामुळे नागरिकांचा सतत राबता असलेले  हे सेंटर, कल्याण तालुक्यात फार कमी कालावधीत नावारुपाला आले. सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर, आज कित्येक नवख्या तरुणांना व्यवसायात य़ेण्यासाठी उद्युक्त करते आहे. लोकाभिमुख सेवा हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असे ते सांगतात. केवळ तीन वर्षात ग्राहकांची पसंती मिळवण्यात निलेशला यश मिळाले, मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

निलेश अभंग यांचे प्राथमिक शिक्षण नेतिवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी कल्याण येथील कॅप्टन रविंद्र माधव ओक हायस्कूलमध्ये गेले. लहानपणापासून शिक्षण आणि वाचनाची आवड असल्याने  वर्गात अव्वल क्रमांकावर राहायचे. शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत सतत प्रथम क्रमांकावर असायचे. कुटुंबात धाकट्या दोन बहिणी, आई-वडील. सुरुवातीपासून परिवाराची आर्थिक परिस्थीती तोळामासाच. त्यामुळे हायस्कूलच्या शिक्षणात अनेक अडचणी येत. आईचा पुर्ण पाठिंबा आणि निलेशजींच्या जिद्दीमुळे मार्ग निघत गेले.

अगदीच इयत्ता नववीपासून ‘कमवा आणि शिका’ या ब्रीदवाक्याचा नाइलाजाने त्यांना अंगिकार करावा लागला. नववीनंतरच्या शालेय सुट्ट्यांमध्ये कुरिअर कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले. चौदा वर्षांचा लहानगा भर उन्हाळ्यात कल्याणहून सायकलने मधल्या रस्त्यातील गावांमध्ये कुरीयर टाकत बदलापुरात पोचत असे. अन् बदलापुरातील कुरीयर पोचवल्यावर कल्याणच्या दिशेने आपल्या सायकलीवर परतीच्या प्रवासाला निघत असे. (कल्याण ते बदलापुर रस्त्याने अंतर साधारणत: १८ किलोमीटर आहे.) अशाप्रकारे तीन महिने सातत्याने काम करुन दरमहा मिळालेल्या पगाराची रक्कम दहावीच्या शिक्षणासाठी राखून ठेवली. या कामामुळेच दहावीचे शिक्षण करता आले. शालेय शिक्षण घेत असताना शिक्षिका लोखंडे बाई व इंग्रजी विषय शिकवणारे शिंदे सर यांचा विशेष प्रभाव पडला.

आर्थिक स्थिती सुधारावयाची असल्यास शिक्षण घेतलेच पाहिजे, याची पक्की जाणीव निलेश यांना त्या वयातही होती. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता, वाचनामुळे मराठी भाषेची उत्तम समज तयार झाली होती, त्यामुळेच शाळेत आणि शाळेबाहेरही विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत असत. तसेच दहावीसुद्धा प्रथम वर्गात पास झाले.

  पुढे बिर्ला महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर अचानक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने निलेश यांच्यावर काम करण्याची वेळ आली अन् अकरावीमध्येच अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागेल. मग या काळात त्यांनी वृत्तपत्र विकणे, मेडिकलमध्ये काम करणे, प्रेसमध्ये बाइंडिंगची कामे करणे असे नाना तऱ्हेची कामे केली. शिक्षण पुर्णत: ठप्प झाले होते. तीन वर्षे पडेल ती कामे करत कुटुंबाला हातभार लावत राहिले. सकाळच्या वेळेत स्टेशनचा पेपर स्टॉल चालूच होता, दिवसा मागून दिवस जात होते आणि निलेशजींमध्ये अन् शिक्षणात अंतर पडत होते. शिक्षणाची आवड होती, परंतु परिस्थिती परवानगी देत नव्हती, तेव्हा अशा वेळेत संगीता हसे ह्या बहिणीने निलेश यांना "पुन्हा शिक्षण सुरू कर" असा सल्ला दिला आणि तो सल्ला मानून तीन वर्षांच्या गॅपनंतर बारावी १७ नंबरचा  फॉर्म भरुन परिक्षा दिली आणि ७०% गुण मिळवून पास झाले. त्यांच्या सर्व हितचिंतकांना फार आनंद झाला. शिक्षणाच्या रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

खुप विचारांती B.M.M (Bachelor in Mass Media) करण्यासाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु अडचणी पाठ सोडत नव्हत्या. पहिल्याच सत्रात A.T.K.T.  लागली. कारण होते इंग्रजी! अनेक मराठी माध्यमांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा फार गोची करते. मात्र निलेशरावांचा स्वभाव माघार घेण्याचा नसल्याने इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली. नियमित इंग्रजी वृत्तपत्र वाचन, पुस्तके, आणि मित्र यांच्या साह्याने तीन महिन्यात निलेश उत्तम इंग्रजी बोलू लिहूही लागला.

बिर्ला महाविद्यालयात अकॅडमिक्समध्ये निलेश यांची प्रगती होतच राहीली. अभ्यासात आलेख उंचावतच राहिला. कॉलेजमध्ये असतानाच पुकार (PUKAR,  HYPERLINK "http://www.pukar.org.in/" Partners for Urban Knowledge, Action and Research) या एनजीओच्या वतीने त्यांना सतत दोन वर्षे फेलोशीप्स मिळाल्या. कॉलेजमध्ये फेलोशीप प्रोजेक्टमध्ये असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा समन्वयक होण्याचा मान त्यांना मिळाला.

आर्थिक चणचण पाचवीलाच पुजली असल्याने महाविद्यालयात असताना खर्च भागवण्यासाठी निलेश यांनी पॅन कार्ड बनवून देण्याची एजन्सी घेतली. अन् त्यातील मिळकतीतूनच कुटुंबालाही हातभार लावत राहिले. सतत अभ्यास आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याची तयारी असल्याने ग्रॅज्युएशनला उत्तम गुणांनी पास होत प्रथम श्रेणी मिळवली.

पत्रकारितेत पदवी प्राप्त केल्यानंतर DNA या इंग्रजी वृत्तपत्रात निलेश हे पत्रकार म्हणून रुजू झाले .पत्रकार म्हणून निलेश यांनी फक्त चार महिने काम केले आणि पुढे पुणेस्थित MNC मध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळाल्याने तेथे बस्तान हलवले. तेथील एका वर्षाच्या वास्तव्यात नोकरीतील कामाच्या रटाळ पद्धतीला निलेश कंटाळले. बारा तासाची नाइट शिफ्ट शरीराचे आरोग्यचक्र बिघडवून टाकत होती. काहीतरी नवीन करण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी एका वर्षाने धाडस एकवटून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला अन् कल्याणला पुन्हा व्यवसाय करण्याच्या इच्छेने आले. वर्षभरातील नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर पडली होती. आधीच तुटपुंज्या उत्पन्नाचे असलेले काम वडिलांनी थांबवले होते. हा निलेशजींच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा काळ होता.  

मात्र व्यवसायाला भांडवल लागते अन् तेथे घोडे अडले. त्या भांडवलउभारणीसाठी तब्बल आठ महिने ठाणे ते कर्जत-खोपोली, कल्याण ते कसारा, या दरम्यानच्या स्टेशनांतील भागांमध्ये येणाऱ्या प्रत्येक शाळांमध्ये दहा रूपये किंमत असलेले काळांचे तक्ते (English Tense Chart) विकले. त्यातुन मिळवलेली पुंजी आणि घरात असलेले सोने तारण ठेवले. काही मित्रांनी त्यांना सढळ हस्ते बिनव्याजी काही रक्कम उसनवारीने दिली.

अशाप्रकारे रक्कम जमवून 'गॅलक्सी नेट कॅफे’ या नावाने १ सप्टेंबर, २०१३  रोजी निलेश अभंग यांनी व्यवसाय सुरू केला.  इंटरनेट सेवा लोकांना देण्यासाठी हे नेट कॅफे नेतिवली परिसरात सुरू करण्यात आले. अथक परिश्रमांनी सर्व जुळवाजुळव करुन सुरु केलेल्या कॅफेला थोडाफार प्रतिसाद मिळत होता. व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली होती, मात्र सायबर कॅफेच्या परवान्याचा अर्ज शासकीस प्रक्रियेत असताना परवान्यासाठी स्थानिक पोलीसांनी विचारणा केली. आणि सदर अर्जाची हालहवाल सांगितल्यानंतर, तुम्हाला परवाना येईपर्यंत व्यवसाय करता येणार नाही, असे सांगितले गेले आणि कोर्टात खटला दाखल होवून व्यवसाय सुरुवातीच्या दिड महिन्यातच बंद झाला.

पुढे काय करावे हा प्रश्न मनात घेवून निलेश यांनी पोलीस स्टेशन गाठले तेथे त्यांना पोलीस जनार्दन सानप हे म्हणाले, " अरे अभंग ! तू पत्रकार माणूस, तुला असा उद्योग करायची काय गरज आहे, काही तरी चांगला कायदेशीर उद्योग कर की.”

त्या संभाषणातून निलेश यांनी ठरवले की इंटरनेट कॅफेचे काम बंद करायचे. अत्यंत कष्टाने कमावलेल्या पैशांनी घेतलेले सहा संगणक भंगारमध्ये विकावे लागले. गॅलेक्सी नेट कॅफेच्या जागी सत्यम् फॅसिलिएशन् सेंटर असा शॉपचा बोर्ड लावण्यात आला.

एक स्कॅनर,  एक प्रिंटर, एक कम्प्युटरच्या साहाय्याने सत्यमच्या कामाला सुरुवात झाली. ग्राहकांच्या प्रिंट आउट्स काढून देणे, त्यांची कागदपत्रे स्कॅन करणे, त्यांना काही महत्त्वाचे इमेल्स पाठवण्यासाठी कम्प्युटरचा काही मिनिटांकरीता वापर करु देणे, अशा कामांनी सुरुवात झाली. त्याचबरोबर शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेद्वारांचे ऑनलाईन अर्ज भरणे, पासपोर्टचा फॉर्म भरणे, आधार कार्ड ऑनलाईन दुरूस्त करून देणे, रिक्षा परमिटचे ऑनलाईन अर्ज भरणे, इत्यादी कामे या सेंटरवरुन होऊ लागली. ग्राहकांची रेलचेल चालू झाली. ऑनलाईन असलेले शासकीय एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी विद्यार्थी दूरुन येऊ लागले. निलेशजींच्या संयम आणि सहनशीलतेला यश मिळू लागले होते. पुढे या केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत केंद्राचा परवाना मिळाला. कामाची चोख पद्धत आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे सेंटर अल्पावधीतच कल्याण तालुक्यात लोकप्रिय झाले.

ग्राहकांची संख्या वाढल्याने तत्पर सेवा देण्याकरीता निलेशजींनी उत्तम टीम उभारली. आज एकूण सात जणांची सत्यम् फॅसिलिएशन् सेंटरची टीम ग्राहकांना सेवा देण्यास सदैव तत्पर असते.    
     
         कल्याण पूर्व मधिल अधिकृत शासकीय कागदपत्रे बनवण्याचे ठिकाण म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटरला शासनाने मान्यता दिलीच, मात्र नागरिकांनी गेल्या तीन वर्षात सातत्याने सेंटरला कामानिमित्त हजेरी लावून त्यांच्या विश्वासाची मोहोर सत्यमवर उमटवली. आज ठाणे जिल्ह्यातील ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टमध्ये सर्वात जास्त कार्यरत असलेले सेंटर म्हणून सत्यम फॅसिलिएशन् सेंटर गणले जाते. अत्यंत योग्य दरात काम करणे व लोकाभिमुख सेवापद्धतीमुळे नागरिकांचा ओढा सत्यमकडे असतो.

निलेशजी इतर सेंटर चालकांना सतत मदत करत असतात. त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडवण्यात सतत अग्रभागी असतात. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील ई-सेवा केंद्र चालकांना शासनाच्या विविध सेवांचे प्रशिक्षण विनामूल्य देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा कित्येक सेंटर चालकांनी उपयोग करुन स्वत:च्या व्यवसायात भरघोस वाढ केली आहे. या सेंटर चालकांना प्रशिक्षित करुन शासनाच्या विविध योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवणे, हेच निलेश अभंग यांचे उद्दीष्ट आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व महा-ई सेवा केंद्र आणि शासनाच्या कॉमन सर्व्हिस सेंटर्ससाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्याचा निलेशरावांचा मानस आहे.

संपर्क : ८९७६६२५६९५, Email Id – nileshabhang5@gmail.com

Saturday, 5 November 2016

नरेंद्र नारायण सुर्यवंशी शिलेदार !! सर्वपक्षीय शिवजयंतीचा




          संपूर्ण कोळशेवाडीचे नाना यांचे मुळ नाव नरेंद्र नारायण सुर्यवंशी. परंतु पंचक्रोशीत नाना नावाने प्रसिद्ध. शालेय जीवनापासून चुणचुणीत, हुशार विद्यार्थी होते. त्यांना इयत्ता चौथीत शिष्यवृत्ती मिळाली होती. पूर्व प्राथमिक शिक्षण गणेश विद्यामंदिर या शाळेत झाले. पुढिल शिक्षणासाठी त्यांनी न्यु हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला, मग कल्याण पूर्व ते कल्याण पश्चिम असा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मित्रांबरोबर घरातील बहिन-भावंडही सोबतीला होते. शाळेत असतांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे उदा.भंडारी, क्रिकेट, ट्राफी तसेच राष्ट्रभक्ती आणि शिस्त यांचे धडे N.C.C. मध्ये कॅडेट म्हणून गिरवता आले. असे बहुआयामी व्यक्ती पुढे शिक्षणाच्या चौकटीत बसणं अशक्य होतं म्हणुन दहावी नंतर श्रीराम पाॅलीटेकनिक या महाविद्यालयात प्रवेश Civil engineering  Diploma साठी  घेतला.

            शिक्षण की काम यात निर्णय घेण्याची वेळ आली आणि नानांनी कामाला महत्त्व देवून शिक्षण थांबवले. या हिर्‍याला पैलू पाडण्याचे कार्य सुर्यवंशी गुरूजी जे नानांचे गुरू आणि काका आहेत त्यांनी केले. भगवानशेठ भोईर यांनी नानांच्या अंगी असलेले गुण ओळखून लहानपणीच कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.   भगवानशेठ भोईर व सुर्यवंशी गुरूजी यांनी बाळकडू पाजून हा सामाजिक कार्यकर्ता तयार केला. कार्यकर्ता म्हणून जी योग्यता हवी होती ती योग्यता नानांकडे उपजतच होती. वडीलांनी पण पाठिंबा दिला होता. त्यांनी नानांना असा सल्ला दिला होता की, " शिक्षण सोड पण व्यवसाय व्यवस्थित कर". नाना यांच्यातील नेतृत्व गुण ह्या तिघांनी हेरले आणि विकसित होण्यासाठी वाव दिला.

             कोळशेवाडीतील राजकीय, सामाजिक स्तरावरील अनेक संस्थांमध्ये नाना सक्रिय आहेत. समाजात काम करताना स्वच्छतेने केले पाहिजे असे नानांचे मत आहे. नानांना कोळशेवाडी परिचित आहे ती म्हणजे शिवजयंतीचा कार्यकर्ता. सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे काम नाना वय वर्षे चौदा पासून आजतागायत अविरतपणे करीत आहे. या उपक्रमात नानांनी अनेक भुमिका समर्थपणे पार पाडल्या. नानांचा "सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष" असा उल्लेखनीय प्रवास आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीचे रूपांतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवमहोत्सवात रूपांतर केले. या महोत्सवात नवनवीन कल्पना घेऊन नवीन उपक्रम आणले. उदाहरणार्थ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन, शिवकालीन किल्यांचे छायाचित्रे प्रदर्शन, शिवकालीन मुद्राचे प्रदर्शन, शिवचरित्रावरील व्याख्याने, शिवचरित्रावरील प्रश्नमंजुषा,  किल्ले बनवण्याची स्पर्धा असे भरीव कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्ते यांना सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवजयंतीच्या कार्यात नवनवीन तरूण कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते. आणि आज सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे तीस वर्षे पूर्ण केले आहेत. यात वेळोवेळी येणारी जबाबदारी नानांनी यशस्वीपणे पार पाडली. यात त्यांच्या सहकार्याचे सहाय्य मोठ्या प्रमाणात होत आहे.
         
            शिवजयंतीच्या कार्यकर्ता बरोबर नाना हे अनेक संस्थांच्या महत्वाच्या पदावर आहेत. त्यात जरी मरी सेवा मंडळाचे "सचिव" पद जबाबदारीने सांभाळत आहेत. आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर तिसाई मंदिरात होणारे उत्सव, नवरात्र उत्सव, चैत्र पौर्णिमा उत्सव, तिसाई देवीची जत्रा अशा मोठमोठ्या उत्सवाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करीत आहे. कितीही कठीण परिस्थितीत काम करणे आणि त्यातून मार्ग काढणे ही कला नानांना चांगलीच अवगत आहे.
         
         स्वामी विवेकानंद सार्थशती मध्ये नानांवर "संयोजक" म्हणून महत्वाची भूमिका होती. सर्व वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्र घेऊन नानांनी काम केले.  यात युवा दौड, शोभा यात्रा, व्याख्याने आणि निबंध स्पर्धा या कार्यक्रमांचा समावेश होता. समाजात सतत नवीन काहीतरी करण्याची जिद्द नानांची असते. सर्वपक्षीय शिवजयंतीचे अध्यक्ष असताना त्यांनी शिवकल्याण पुरस्काराची सुरवात केली, आजही हा पुरस्कार कल्याण पूर्व मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जात आहे.
             
            एक उद्योजक म्हणून नानांची कारकिर्द फार विशाल आहे. नाना हे श्री तिसाई उद्योग समूहाचे संस्थापक संचालक आहेत. शेअर बाजार, बांधकाम, हॉटेल, कृषी अशा विविध क्षेत्रात तिसाई उद्योग समूह कार्यरत आहे. शेअर बाजारातील मराठी माणसांची नामांकित कंपनी म्हणून श्री तिसाई ने ओळख निर्माण केली आहे.
       नाना हे नवनवीन उद्योजकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत आहेत.
     
            नरेंद्र (नाना) सुर्यवंशी हे राजकीय क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कल्याण पूर्वेतील महत्वाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

              नानांच्या या प्रवासात कुटुंबातील व्यक्तीची नेहमीच साथ लाभली. अर्चना ह्या नेहमीच नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत आहे. तर हेतूल हा नानाच्या सार्वजनिक कामात मधून मधून हातभार लावतांना दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा सार्वजनिक जाणिव व भान निर्माण झालेले दिसते. जयच्या अभ्यासाची जबाबदारी आईकडे असते. वडील म्हणून नाना मुलांना एकच सल्ला देतात, "जे काही करायचे ते मन लावुन करा तुम्हाला तुमचे विश्व शून्यातून उभे करायचे आहे".

 वाचकांसाठी संदेश :---
                                सामाजिक, राजकीय, आर्थिक  जीवनात काम करताना निष्ठेने करा.

कोळशेवाडीसाठी संदेश :----
             आपण जेथे राहतो त्या भागामध्ये सामाजिक विचार हा चांगल्या दिशेने वळवता येईल अशा  पद्धतीचेे आपले काम असले पाहिजे.